कराड : कराड दक्षिण मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुल भोसले यांचे स्वीय सहायक अमोल पाटील व फत्तेसिंह सरनोबत यांच्या नावाची दोन मतदारसंघांत नोंदणी आहे. सांगली जिल्ह्यातील अंकलखोपच्या मतदारयादीत पाटील, तर इस्लामपूरच्या मतदारयादीत सरनोबत यांचे नाव आहे. तरीही दोघांची मलकापूरमध्येही मतनोंदणी आहे. त्यामुळे दुबार मतदारनोंदणीतून स्वतः मतचोरी करायची आणि ती लपवण्यासाठी मोठी नावे घ्यायची, हा चोरानेच उलट्या बोंबा मारण्याचा प्रकार असल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबीयांवर दुबार मतनोंदणीच्या केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसनेही पत्रकार परिषद घेतली. पृथ्वीराज चव्हाणांचे स्वीय सहायक गजानन आवळकर, इंद्रजीत चव्हाण, काँग्रेस इतर मागासप्रवर्ग शाखेचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, झाकीर पठाण, अजित पाटील-चिखलीकर, दिग्विजय पाटील उपस्थित होते.
गजानन आवळकर म्हणाले, की माझे वाठार व कराडमध्ये मतदार म्हणून नाव आहे. मी कराडच्या मतदारयादीतून नाव कमी करण्याचा अर्ज दिला होता. मात्र, ते कमी झाले नाही, याला प्रशासन जबाबदार असून, मी दोनदा मतदान केलेले नाही.
इंद्रजीत चव्हाण म्हणाले, की माझा जन्म, वास्तव्य कराडमधीलच आहे. मी पाटण कॉलनीत राहताना तेथे नाव होते. त्यानंतर मी पवार कॉलनीत राहायला गेलो. तेथे नाव लावले. त्या वेळी पाटण कॉलनीतील नाव कमी झाले. त्यानंतर मलकापुरात राहायला गेलो. त्या वेळी पवार कॉलनीतील नाव कमी करण्याचा अर्ज दिला; मात्र, नाव कमी झाले नाही. त्याला प्रशासनच जबाबदार आहे. माझी पत्नी, मुलगा व आई यांच्याही नावांची दुबार नोंदणी रद्द करून ती एकाच ठिकाणी ठेवायची होती. पण, त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. मतदार याद्यात दुबार नावे असली तरी आम्ही एकाच ठिकाणी मतदान केले आहे. भाजपकडून बोगस मतांची चोरी लपवण्यासाठी मोठी नावे घेतली जात आहेत.
दिग्विजय पाटील म्हणाले, की विद्यमान आमदारांचे दोन स्वीय सहायक असून, त्यांची नावे त्यांच्या मतदारसंघात व कराड दक्षिणमध्येही आहेत. कृष्णा भौतिकोपचारशास्त्र महाविद्यालयातील ५२ विद्यार्थ्यांची मतनोंद कराड दक्षिणमध्ये आहे. शिवनगरच्या मतदान केंद्रावर ती नोंदणी दिसत असून, काही निवृत्त कामगारांची नावेही रेठरे बुद्रुकच्या मतदारयादीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.