सांगली : फटाक्याची आताषबाजी, ढोल-ताशांचा कडकडाट आणि गुलालाची उधळण करीत सांगलीच्या काँग्रेस समितीसमोर शनिवारी दुपारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचा विजयोत्सव साजरा केला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जसे जसे जाहीर होउ लागले तस तसे काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेस समितीसमोर जमा झाले. दुपारी काँग्रेसची एकहाती सत्ता कर्नाटकात येणार हे स्पष्ट होताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आताषबाजी करीत गुलालाची मुक्त उधळण करीत साखर वाटप केले.
हेही वाचा >>> Karnataka Election Results 2023 सीमावर्ती भागातील घवघवीत यशाने सोलापुरात काँग्रेसमध्ये नवचैतन्य
कर्नाटकात चाळीस टक्के कमिशनचे भाजप सरकार सामान्य जनतेने लाथाडलेलं आहे, आणि राहुल गांधी तसेच प्रियांका गांधी यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेसचे सरकार बहुमताने सत्तेवर आणलेले आहे. या निवडणुकीचा महाराष्ट्रातसुद्धा चांगला परिणाम होणार आहे. अन्य काही राज्यात होणार्या निवडणुकीतही काँग्रेसच्यादृष्टीने एक नवे पर्व सुरू होईल, यात शंका नाही, असे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यावेळी म्हणाले.
यावेळी प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील, नगरसेवक मयुर पाटील, तौफिक शिकलगार, अमर निंबाळकर, बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे, बिपीन कदम, प्रा. एन. डी. बिरनाळे, रविंद्र खराडे, सनी धोत्रे, आशिष कोरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कर्नाटकमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवल्याबद्दल जत शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांसह आ.विक्रम सावंत यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी दुचाकीवरून विजयाच्या घोषणा देत रॅलीही काढण्यात आली. कर्नाटकमध्ये झालेला काँग्रेसचा विजय हा सामान्य माणसांनी भ्रष्टाचारावर, जातीयवादावर व्यक्त केलेला रोष असल्याची प्रतिक्रिया आ. विक्रम सावंत यांनी व्यक्त केली. तसेच विटा शहरातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना साखर भरवत कर्नाटकमधील काँग्रेस विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.