काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट घेतलेल्या अमरावती जिल्ह्य़ातील नऊ शेतकरी विधवांना तातडीने आर्थिक मदत द्या, हा पक्षश्रेष्ठींनी दिलेला आदेश युवक काँग्रेस वगळता राज्यातील एकाही बडय़ा नेत्याने मनावर घेतलेला नाही. राहुल भेटीनंतर केवळ ५० हजाराची मदत युवक काँग्रेसकडून मिळालेल्या या विधवांकडे सामाजिक संस्थांनी सुद्धा लक्ष न दिल्याने ‘आणखी कलावती’ निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयोग फसण्याची शक्यता वाढली आहे.
गेल्या २९ एप्रिलला राहुल गांधी यांनी अमरावती जिल्ह्य़ातील धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील पाच गावातील नऊ शेतक री विधवांची भेट घेतली. यावेळी त्यांनी केलेली पदयात्रा व घेतलेल्या भेटी या पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याने, तसेच यात गांधी घराण्याची प्रतिष्ठा जुळलेली असल्याने या नऊ कुटुंबांना भरघोस आर्थिक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, असे आदेश पक्षश्रेष्ठींकडून राज्यातील नेत्यांना पदयात्रेच्या वेळीच देण्यात आले. या दौऱ्याचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या राहुल ब्रिगेडमधील पदाधिकाऱ्यांनी याच वेळी तशा सूचना सर्व नेत्यांना दिल्या होत्या. आता आठवडा लोटला तरी या विधवांच्या पदरी काहीच पडलेले नाही.
राज्यातील बडे नेते, उद्योग समूह अथवा सामाजिक संस्थांनी सुद्धा मदत देणे आजवर टाळले आहे. पक्ष सत्तेत नसल्याचाच हा परिणाम आहे, अशी प्रतिक्रिया आता पक्ष वर्तुळातच व्यक्त होत आहे. राहुल गांधींनी २००५ मध्ये यवतमाळ जिल्ह्य़ाचा दौरा करून शेतकरी विधवांच्या भेटी घेऊन त्याचा उल्लेख थेट लोकसभेत केला होता. बिहारच्या सुलभ इंटरनॅशनलने तर ३० लाख रुपये दिल्याने त्यातील एक विधवा कलावतीचे नाव देशभर झाले. आता बडय़ा नेत्यांची उदासीनता, संस्था व उद्योग समूहांनी दाखवलेली पाठ, यामुळे या भेटीच्या भांडवलावर राजकीय पोळी शेकून या दौऱ्याच्या निमित्ताने आणखी काही कलावती निर्माण करण्याचा राहुल ब्रिगेडचा प्रयत्न फसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी एकटा किती मदत करू -आ. जगताप
धामणगावचे काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांना विचारले असता ‘या विधवांना तातडीने आर्थिक मदतकरा, अशा सूचना पक्षश्रेष्ठींकडून मिळाल्या होत्या, पण युवक काँग्रेसचा अपवाद वगळता अजून कुणीही मदत केलेली नाही’, हे त्यांनी मान्य केले. ‘मी एकटा किती मदत करणार? मलाही मर्यादा आहेत. या भेटीशी राहुल गांधींची प्रतिष्ठा जुळलेली असल्याने सर्वानीच सक्रिय होणे गरजेचे आहे. अजून कोणतीही संस्था पुढे आलेली नाही. आता शोध घेणे सुरू आहे’, असे जगताप म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress experiment of creating more kalawati likely to fail
First published on: 05-05-2015 at 02:05 IST