देशाला पुढे नेण्यासाठी विविध क्षेत्रांत महाराष्ट्राने नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. तोच महाराष्ट्र आज रसातळाला नेण्याचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी करत आहे. देशाचा एकूण कल पाहता जनता नाकारण्याची भीती वाटत असल्याने राहुल गांधीही आदर्श घोटाळय़ात गडबड असल्याचे सांगू लागले आहेत, मात्र महाराष्ट्रासह देशात भाजप व मित्रपक्षांची सत्ता येणार असल्याचा विश्वास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला.
मध्य प्रदेशात भाजपच्या विजयाची हॅटट्रिक साधणारे चौहान शिर्डीहून नाशिककडे जाताना काही काळ संगमनेरमध्ये थांबले होते. भाजप, शिवसेना व मित्रपक्षाच्या पदाधिका-यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मध्य प्रदेशसह चार राज्यांत भाजपला मिळालेले यश हे सरकारच्या कामाचा, विचारधारेचा व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून मिळाले आहे. सलग तीनदा मुख्यमंत्री होणे ही सोपी बाब निश्चितच नाही, मात्र आपण राज्याचे चित्र बदलवण्याचे काम केले. राज्यात रस्त्यांचे जाळे बनविले. जनतेला २४ तास वीज, १ रुपया किलोने गहू व तांदूळ तसेच साडेसात लाख हेक्टरवरील सिंचनाचे क्षेत्र थेट २५ लाख हेक्टरवर नेले. लोककल्याणाच्या योजना राबवल्याने माझे सरकार जनतेला आपले वाटू लागले आहे.
जो जनतेची सेवा करेल त्याला जनता निवडून देते हेच या निकालातून अधोरेखित झाले आहे. जातीच्या आधारावर, लोकांत संभ्रम निर्माण करून, घोषणाबाजी करून निवडून येण्याचे दिवस आता संपले आहेत. लोकसभेच्या आगामी निवडणुकीतदेखील मध्य प्रदेशात भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून देणार आहे. महाराष्ट्राविषयी सध्या फारसे आशादायी चित्र नसल्याचे स्पष्ट करत ते म्हणाले, की येथे सत्ताधा-यांचे एकामागून एक घोटाळे समोर येत आहे. त्यामुळे विकास थांबला आहे. महागाईसारख्या प्रश्नाने जनतेचे खच्चीकरण झाले. त्यामुळे २०१४च्या लोकसभा निवडणुकीतदेखील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप व मित्रपक्षांचे सरकार सत्तेत येणार आहे.