रस्त्यांवरच्या खड्ड्यांबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. रस्त्यावर खड्डे पडणे म्हणजे आभाळ कोसळणे नाही. पाऊस आला की खड्डे पडतातच. आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राला भरीव निधी मिळाला नाही. त्यामुळे जास्त काळ टिकतील अशा रस्त्यांची निर्मितीच झाली नाही. याच कारणामुळे राज्याला खड्ड्यांची समस्या सतावते आहे. आत्ता रस्त्यांवर पडलेले खड्डे हे आघाडी सरकारच्या काळातले आहेत. नव्याने कोणतेही खड्डे पडले नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. परभणीत झालेल्या एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असणाऱ्या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र डेडलाईन जवळ आलेली असताना चंद्रकांत पाटील यांनी अशा प्रकारे वक्तव्य करणे म्हणजे त्यांचे आश्वासन पूर्ण न होण्याची जाणीव आहे असेच दिसते आहे. राज्यातल्या सगळ्या प्रमुख शहरांमध्ये खड्डे ही समस्या मोठी आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर ‘सेल्फी विथ खड्डा’ अशी मोहिमही हाती घेतली. विरोधकांनी खड्ड्यांच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर टीकाही केली होती.

मोठ्या प्रमाणावर टीका झाल्याने चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबर पर्यंत एकही खड्डा दिसणार नाही अशी घोषणाच करून टाकली. त्यांच्या या घोषणेमुळे विरोधकांची तोंडं काही प्रमाणात बंद झाली खरी मात्र मागील तीन वर्षात खड्डाच पडला नाही असे सांगत त्यांनी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे खापरही आघाडी सरकारवरच फोडले आहे. तसेच एकीकडे खड्ड्यांमुळे लोकांचे बळी जात असूनही खड्डे पडणे ही काही आभाळ कोसळण्याएवढी मोठी समस्या नाही असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे विरोधकांना टीका करण्यासाठी नवा मुद्दाच मिळाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress government responsible for road potholes says minister chandrakant patil
First published on: 14-11-2017 at 20:55 IST