संगमनेर : गेल्या हंगामात थोरात कारखान्याने उसाला ३ हजार २०० असा भाव दिला आहे. येत्या काळात प्रत्येक शेतकऱ्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी शंभर टन उत्पादन केले पाहिजे, अशी अपेक्षा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात आज ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मा. आ. डॉ. सुधीर तांबे होते. कांचनताई थोरात, उपाध्यक्ष पांडुरंग घुले, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे, डॉ. जयश्री थोरात, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, लहानभाऊ गुंजाळ, मीराताई शेटे, दिपाली बर्पे, डॉ. तुषार दिघे, अरुण वाकचौरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, मागील हंगामात भाव देतानाच कारखान्याने कामगार, सभासद, ऊस उत्पादक, व्यापारी यांची सर्व देणी वेळेत दिली आहेत. यावर्षी ९ लाख टनापेक्षा जास्त गाळप होणे अपेक्षित आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने व निळवंडेचे पाणी आल्याने ऊस लागवड चांगली आहे. पुढच्या वर्षी १५ लाख टनापर्यंत गाळप होईल. जास्त गाळप झाले तर बगॅस जास्त निघतो, ‘को जनरेशन’ चांगले होते, त्यातून मोठ्या प्रमाणावर वीज निर्माण देखील होते. ऊस गाळप करताना उतारा महत्त्वाचा असतो. त्यामुळे परिपक्व ऊस आणला गेला तर चांगले परिणाम दिसतात. येत्या एक जानेवारीपासून कामगारांना दहा टक्के पगारवाढ देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

माजी आमदार डॉ. तांबे, डॉ. जयश्री थोरात यांचीही यावेळी भाषणे झाली. कार्यकारी संचालक घुगरकर यांनी प्रास्ताविक केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन, तर उपाध्यक्ष घुले यांनी आभार मानले.