लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर: पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सातवेळा निवडून गेलेले काँग्रेसचे माजी खासदार संदीपान भगवान थोरात(वय ९१) यांचे शुक्रवारी सायंकाळी सोलापुरात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात वृध्द पत्नीसह चार विवाहित पुत्र, तीन विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे.

अलिकडे राजकारणापासून दूर राहिलेले थोरात यांना गेल्या अनेक दिवसांपासून हृदयविकारासह पोटाचे विकार आणि श्वसनविकाराने ग्रासले होते. प्रकृती खूपच बिघडल्यामुळे त्यांच्यावर गेल्या ११ मार्चपासून सोलापुरात एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना कृत्रिम जीव संरक्षक यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी रूग्णालयात धाव घेऊन थोरात यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. परंतु अखेर शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

सामान्य मातंग समाजातून आलेले आणि गांधी घराण्यावर एकनिष्ठ म्हणून ओळखले गेलेले संदीपान थोरात हे पेशाने वकील होते. ते माढा तालुक्यातील निमगाव येथील मूळ राहणारे होते. तरूणपणीच काँग्रेसच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले. १९७७ साली काँग्रेसच्या पडत्या काळात त्यांना पंढरपूरच्या तत्कालीन लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. तेव्हा देशभर जनता पक्षाची लाट असतानाही थोरात हे निवडून आले होते. नंतर त्यांनी मागे पाहिलेच नाही. पुढे १९८०, १९८४, १९८९, १९९१, १९९६ आणि १९९८ पर्यंत असे सलग सातवेळा थोरात यांनी पंढरपूर मतदारसंघातून लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर त्यांची अढळ निष्ठा होती. त्यामुळेच त्यांना लोकसभेत प्रदीर्घकाळ प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. पंढरपूर मतदारसंघात विकासाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात त्यांचे फारसे योगदान नव्हते. पंढरपूर मतदारसंघात ‘खासदार दाखवा आणि बक्षीस मिळवा’ अशा शब्दांसह मौनी खासदार म्हणून त्यांची हेटाळणी होत असे. परंतु तरीही लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येत असल्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या दरबारी थोरात यांची ‘लोकप्रिय नेता’ म्हणूनच नोंद होती. त्यांनी माढा येथे जगदंबा मागासवर्गीय शेतकरी सहकारी सूतगिरणीची उभारणी केली होती. परंतु ती थोड्याच काळात बंद पडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, १९९९ साली काँग्रेसमधून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर त्याचवर्षी लोकसभा निवडणुका झाल्या. तेव्हा पंढरपूरमध्ये काँग्रेसने पुन्हा आठव्यांदा उमेदवारी दिली होती. परंतु राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले रिपाइं नेते रामदास आठवले यांच्याकडून थोरात यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर मात्र ते राजकारणापासून दूर राहिले होते.