गेल्या काही दिवसांत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा कैवार घेतलेला काँग्रेस पक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्या कृत्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी एका शेतकऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामुळे अब्दुल सत्तार आणि काँग्रेस पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे. जमिनीच्या अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याचे समजत आहे. अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचे आमदार आहेत. या ठिकाणी असलेल्या शेतजमिनीवरून अब्दुल सत्तार आणि मुख्तार सत्तार यांच्यात वाद आहे. अब्दुल सत्तार आणि मुख्तार सत्तार यांच्या शेतजमिनी आजुबाजूला आहेत. मात्र, अब्दुल सत्तार आपली जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मुख्तार यांचे म्हणणे आहे. कालदेखील याच मुद्द्यावरून अब्दुल सत्तार आणि मुख्तार सत्तार यांच्यात वाद झाला. यावेळी अब्दुल सत्तार यांच्याबरोबर पोलीस आणि कार्यकर्ते होते. सुरुवातीला अब्दुल सत्तार आणि मुख्तार सत्तार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. तेव्हा अब्दुल सत्तार यांनी मुख्तारला शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या मुलाने आणि कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मुख्तार सत्तार यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी मुख्तार सत्तार यांनी सिल्लोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलीस राजकीय दबावापोटी अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप मुख्तार यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, अब्दुल सत्तार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मुख्तार सत्तार ज्या जमिनीवर दावा करत आहेत ती जमीन दलित समाजातील सखाराम कल्याणकर यांची आहे. तक्रारदार त्यांना ही जमीन परत देण्यासाठी तयार नाही. काल हा प्रकार घडला तेव्हा या जमिनीलगत असलेल्या आमच्या जमिनीत पेरणी सुरु होती. तेव्हा वाद सुरु झाला. त्यामुळे मी पोलिसांना बोलवून या भांडणात पडलो. कल्याणकर यांना मारहाण सुरु झाली होती. मी मध्ये पडलो नसतो तर त्यांचा जीव गेला असता. त्यांच्या सोबत वाद घातला असल्यामुळे मी शिव्या देऊन त्यांना हुसकावून लावलं. जमीन बळकवण्याचा माझ्यावर जो आरोप करण्यात आला आहे. तो निराधार आहे. असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mla abdul sattar abusing and beating farmer in maharashtra create controversy
First published on: 14-06-2017 at 11:49 IST