आजी-माजी मंत्र्यांकडूनपरस्परांचे कौतुक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लातूर :  आम्ही दोन भैया व्यासपीठावर एकत्र आलो, की जिल्हय़ातील तात्या, काका, दादा, अण्णा अशा मंडळींना नक्की त्रास होत असेल, अशी कोपरखळी मारत माजी राज्यमंत्री तथा काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या शैलीचे जाहीरपणे कौतुक केले. चांगल्या कामाचे कौतुक करणे ही लातूरकरांची संस्कृती आहे, असा दाखलाही देशमुख यांनी दिला. मतभेद असले तरी मनभेद न बाळगता काम करण्याची परंपरा चालू ठेवणार असल्याची ग्वाही संभाजी पाटील यांनी दिली. आजी-माजी या दोन मंत्र्यांमध्ये रंगलेली जुगलबंदी आणि परस्परांचे केलेले जाहीरपणे कौतुक लातूरकरांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरला. निमित्त होते लातूर ऑफिसर्स क्लब कोनशिला समारंभाच्या कार्यक्रमाचे.

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व लातूरचे आमदार अमित देशमुख हे सोमवारी एका कार्यक्रमात व्यासपीठावर आले होते. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला लातूर ऑफिसर्स क्लबच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी सकाळी झाले. व्यासपीठावर महापौर सुरेश पवार, महापालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. राजेंद्र माने, आदी उपस्थित होते.

लातूर ऑफिसर्स क्लबची नोंदणी पूवीं झाली होती, मात्र भूकंप, सततचा दुष्काळ यामुळे कामाला गती मिळाली नव्हती. आपण पुढाकार घेऊन लातूरकरांच्या सोयीसाठी या उपक्रमाचा शुभारंभ करत असल्याचे जिल्हाधिकारी जे. श्रीकांत यांनी सांगितले. आमदार अमित देशमुख म्हणाले, दुष्काळग्रस्त लातूरची ओळख पुसून टाकण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रयत्न स्तुत्य असल्याचे सांगितले. आम्ही काही करू पाहिले तर पत्रकार मंडळी बारकाईने लक्ष ठेवून टीकाटिप्पणी करतात. दोन वर्षांपूर्वी दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर व्हॉलिबॉल स्पर्धेच्या मदानावर टँकरने पाणी मारले गेले, यावरून गहजब झाला. त्यानंतर आपल्याला अनेक कल्पना सुचल्या तरी त्या अमलात आणण्यात अडचणी येत होत्या. या इमारतीसाठी निलंगा परिसरातील लाल दगड आणण्याच्या कल्पनेचे आपण स्वागत करतो, असेही ते म्हणाले.

लातूरमध्ये सत्तेत बदल झाला आहे. पहिल्यांदाच आपल्याला कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. हा बदलही स्वागतार्ह असल्याची टिप्पणी करताना आमदार देशमुख म्हणाले, दोन भया व्यासपीठावर नेमके कानात काय बोलतात, याची लोकांना उत्सुकता असते. लातूरच्या हितासाठी काय करता येईल याचीच आम्ही चर्चा करत असतो. राजकारण निवडणुकीपुरते असते. एरव्ही आमचे संबंध जिव्हाळय़ाचे असतात.

पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी ऑफिसर्स क्लबसारख्या उपक्रमाची गरज लक्षात घेऊन त्याची सुरुवात करण्याचे ठरवले आहे, असे सांगितले. आजच थंडी कमी झाली आहे व आता राजकीय गर्मी वाढण्यास सुरुवात झाली असल्याचे सांगितले. निवडणुकीपूर्वी आपण व अमित देशमुख एकत्र आलो ही चांगली बाब असल्याचे पालकमंत्री पाटील म्हणाले. लातूरचे वातावरण हे विकासाचे आहे. या जिल्हय़ाला मोठी राजकीय परंपरा आहे. पूर्वीच्या नेत्यांनी जी पद्धत घालून दिली आहे त्या पद्धतीनुसारच आपण काम करतो. त्यामुळेच या जिल्हय़ात अधिकाऱ्यांना यावेसे वाटते. अमित देशमुखांनी ऑफिसर्स क्लबच्या इमारतीसाठी निलंग्याचा दगड स्वीकारला याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो, असे सांगून कर्नाटकच्या सीमेलगत किंगल नावाचा अतिशय उत्कृष्ट दगड आहे व त्या दगडाचा वापर करून कर्नाटक प्रांतात अनेक इमारती उभ्या राहतात. यामुळे आमच्या परिसरातील लोकांना रोजगार मिळेल व इमारतही चांगली दिसेल यामुळेच आपण ही सूचना केल्याचे ते म्हणाले. मतभेद असले तरी मनभेद न बाळगता काम करण्याची परंपरा चालू ठेवणार असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन बाळकृष्ण धायगुडे यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mla amit deshmukh praised style of guardian minister sambhaji patil
First published on: 12-02-2019 at 01:55 IST