Sulbha Khodke : राज्यात विधानसभेची निवडणूक जवळ आली असून पुढील काही दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या राज्यातील सर्वच पक्षांचे नेते जोरदार कामाला लागले आहेत. अनेक नेत्यांकडून मतदारसंघात मोर्चेबांधणी देखील सुरु आहे. तसेच विविध ठिकाणी सभा आणि मेळावे घेतले जात आहेत. यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचंही पाहायला मिळत आहे.

यातच काँग्रेसच्‍या अमरावती विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सुलभा खोडके या राष्‍ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चांनंतर काँग्रेसने आमदार सुलभा खोडके यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. आमदार सुलभा खोडके यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.

हेही वाचा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “गेली ९९ वर्ष संघाने…”

काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार सुलभा खोडके यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. यासंदर्भातील एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. तसेच याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. आमदार सुलभा खोडके यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे.

सुलभा खोडके राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्‍या आमदार सुलभा खोडके या राष्‍ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चांबाबत त्यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. मात्र, पुढील काही दिवसांमध्ये सुलभा खोडके या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निलंबनाची कारवाई का केली?

आमदार सुलभा खोडके यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.