राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. मात्र, यानंतर विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्यावरून महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र, यावर काँग्रेसनं तीव्र आक्षेप घेतला असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही नैसर्गिक आघाडी नसल्याचं म्हणत थेट महाविकास आघाडीच्या एकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तुटण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

नेमका काय आहे वाद?

महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर विरोधी पक्षात बसलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली. मात्र, विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आग्रही होती. पण शिवसेनेकडून विदर्भातील चेहरा असणारे अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केल्यामुळे काँग्रेस नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. आज नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात केलेल्या विधानामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे.

विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेसनंतर राष्ट्रवादीचीही नाराजी, जयंत पाटील म्हणाले, “शिवसेनेने कोणतीही…”

काय म्हणाले नाना पटोले?

माध्यमांशी बोलण्यापूर्वी नाना पटोले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील यावर नाराजी व्यक्त केली. “विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाची निवड करताना महाविकास आघाडी म्हणून चर्चा होणं आवश्यक होतं. मात्र, तशी चर्चा करण्यात आली नाही. आम्हाला विचारात घेतलं गेलं नाही. निवड कुणाचीही होवो, पण चर्चा होणं गरजेचं होतं. त्यामुळे आमचा या निवडीला विरोध आहे”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

“कायमस्वरूपी हा शब्द वापरलाच नाही”

दरम्यान, महाविकास आघाडी कायमस्वरूपी असल्याचा शब्द आम्ही कधी वापरलाच नसल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत. “आमची ही काही नैसर्गिक आघाडी नाही. ही आघाडी विपरित परिस्थितीत महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी त्यावेळी केली. आम्ही काही सत्तेत नव्हतो. विरोधी पक्षात बसण्याचा कौल आम्हाला जनतेनं दिला होता. त्याप्रमाणे विरोधी पक्षात बसण्याची आमची मानसिकता होती. आम्ही विपरीत परिस्थितीत आघाडी केली. कायमस्वरूपी असा शब्द आम्ही वापरला नाही. नैसर्गक आघाडी असं आम्ही म्हटलंच नाही”, असं नाना पटोले म्हणाले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिक निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार?

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढवाव्यात, अशी अपेक्षा काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली होती. त्यासंदर्भात बोलताना नाना पटोले यांनी स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय होईल”, असं ते म्हणाले आहेत.