महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेचा पेच सुटण्याचं चिन्ह आता निर्माण झालं आहे. शुक्रवारी नेहरु सेंटरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक बाबींवर चर्चा झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रमुख नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि अहमद पटेल उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद स्वीकारावं असा प्रस्ताव मांडण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी जरी तिन्ही पक्षांची बैठक झाली असली तरी आज (शनिवार) पुन्हा एकदा तिन्ही पक्षांची बैठक होणार आहे.

नेहरू सेंटरमध्ये दुपारी २ वाजता महाआघाडीची पुन्हा एकदा बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत काही मुद्द्यांवर तोडगा निघाल्यानंतर महाआघाडी सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पहिली पसंतीही उद्धव ठाकरेंच्याच नावाला होती. काँग्रेस नेतेही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास तयार आहेत. शिवसेनेच्या आमदारांनीही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट केलं. त्यानंतर महाविकासआघाडीच्या बैठकीत यासंदर्भातला प्रस्ताव मांडण्यात आला होता.

शुक्रवारी झालेल्या महाआघाडीच्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी सेनेची भूमिका स्पष्ट केली. ‘आत्ता माझ्याकडे सांगण्यासारखं नाही. अजून चर्चा सुरू आहे. आम्ही असं ठरवलं आहे की एकही गोष्ट अनुत्तरीत ठेवायची नाही. अनेक मुद्द्यांवर वर एकमत झालं आहे. थोडे फार बारकावे बाकी आहेत. त्यावर चर्चा सुरू आहे. मला अर्धवट माहिती द्यायची नाही. म्हणून आत्ता बोलणार नाही. एकत्र पत्रकार परिषद घेऊन घोषणा करू’, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली होती. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी शनिवारीही याबाबत पुन्हा चर्चा होणार असल्याचं स्पष्ट केलं.