काँग्रेस-राष्ट्रवादीशी संभाव्य आघाडी
महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्ष-राष्ट्रवादी-काँग्रेस अशा संभाव्य आघाडीचा चेंडू आता सर्वच पक्षांच्या वरिष्ठांच्या कोर्टात गेला आहे. मुख्यत: याबाबत भाजपचे प्रदेश श्रेष्ठीच निर्णय घेणार असून त्यावरच शिवसेनेशी दोन हात करायचे की नाही, हे ठरेल.
महापौर अभिषेक कळमकर व उपमहापौर सुवर्णा कोतकर यांची मुदत येत्या दि. ३० ला संपते. येत्या दि. २१ ला नव्या पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे. त्यादृष्टीने शहरातील राजकीय हालचालींना कमालीचा वेग आहे.
उपमहापौरपद भाजपला देऊ करीत महापौरपदासाठी शिवसेनेने महिनाभरपूर्वीच मोर्चेबांधणी करीत मोठी जुळवाजुळव केली असताना ऐनवेळी भाजपच्या गांधी गटाने महापौर-उपमहापौरपदासह सर्वच सत्तास्थानांवर दावा सांगून काँग्रेस आघाडीशी हातमिळवणीच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. त्यामुळेच शहरात खळबळ उडाली असून शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपतील गांधी गटाच्या या हालचालींमुळे मनपातील सत्तास्थापनेतील रंगत वाढली असली तरी यात भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. काँग्रेस आघाडीशी जुळवाजुळव करण्यात तेच आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते. मनपात भाजपची सत्ता आणण्यासाठी त्यांनी बऱ्याच गोष्टींची तयारी दर्शवल्याचे समजते. मनपातील सत्तास्थापनेत राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्याशी हातमिळवणी करण्याबाबतचा गांधी व कर्डिले यांनी पक्षाच्या प्रदेश श्रेष्ठींपर्यंत निरोप पोहोचवला असल्याचे समजते. यावर त्यांच्या आदेशाची प्रतीक्षा या दोन्ही गटांना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना निश्चिंत
भाजपतील गांधी गटाच्या संभाव्य हालचालींनी शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र निवडणुकीबाबत ते निश्चिंत असल्याचे सांगण्यात येते. आमच्याकडे मतदानासाठी ३४ आणि गैरहजर राहणारे अन्य पक्षातील सहा ते सात नगरसेवक आहेत, असे या गोटातून सांगण्यात आले. अन्य कोणतीही मोट बांधली तरी, शिवसेनेला अडचण येणार नाही, असा दावा या सूत्रांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ncp to make alliance in ahmednagar local body poll
First published on: 12-06-2016 at 01:40 IST