राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत होणारी काँग्रेस-राष्ट्रवादीची आजची बैठक रद्द झाली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम असल्याने आघाडीची आज होणारी बैठक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता ही बैठक उद्या होणार असल्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी वर्तवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त काँग्रेसकडून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, बैठकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते दिल्लीत दाखल झालेले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीकडून अजित पवार, नवाब मलिक, सुनील तटकरे तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, के.सी.पाडवी आदींचा समावेश  आहे.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून सोमवारी घेण्यात आलेल्या  पत्रकारपरिषदेद्वारे सांगण्यात आले होते की, राज्यातील सत्तास्थापनेबद्दल निर्णय घेण्यासाठी पुढील एक ते दोन दिवसात आमचे सर्व नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील. विशेष म्हणजे यावेळी शरद पवार यांनी शिवसेनबरोबर सरकारस्थापनेसंदर्भात काहीच सांगितले नव्हते. आता या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आघाडीच्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. मात्र, आजची बैठक रद्द झाली असून उद्या ही बैठक होऊ शकते, अशी माहिती देण्यात आलेली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ncps meeting in delhi canceled today msr
First published on: 19-11-2019 at 11:58 IST