परभणी : काँग्रेसचे माजीमंत्री तथा विद्यमान जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंगळवारी (दि.२९) मुंबईत ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या कार्यक्रमासाठी वरपूडकर यांचे समर्थक, कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
सुरेश वरपूडकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत पाथरी मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीआधी वरपूडकर यांनी दीर्घकाळ सिंगणापूर या विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले. १९८० च्या दशकात अपक्ष आमदार म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. या मतदारसंघातून पुढे काँग्रेसचे आमदार म्हणून ते विजयी होत गेले. लोकसभेच्या १९९८ च्या मुदतपूर्व निवडणुकीत काँग्रेसने सुरेश वरपूडकर यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी शिवसेनेच्या सुरेश जाधव यांचा सरळ लढतीत पराभव केला. शरद पवार यांनी काँग्रेसविरुद्ध बंड पुकारून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पवारांच्या बंडाला पाठिंबा देणारे आणि त्यांचा अनुनय करणारे वरपूडकर पहिले खासदार होते.
पाच वेळा आमदार, एक वेळ खासदार, माजी मंत्री, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अशी अनुभवी राजकीय कारकीर्द असलेले वरपूडकर जिल्ह्यातले महत्त्वाचे नेते मानले जातात. सुरुवातीला दीर्घकाळ राष्ट्रवादीत घालवलेल्या वरपुडकरांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता, त्यानंतर या पक्षात ते चांगलेच स्थिरावले. काँग्रेसलाही वरपूडकरांच्या रूपाने जिल्ह्यात भक्कम संघटनात्मक ताकद असलेला नेता मिळाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वरपूडकर पाथरी मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर पक्षाची सर्व सूत्रे त्यांच्या हाती आली.
अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर वरपूडकरही काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देतील असा तर्क व्यक्त केला जात होता पण वरपूडकर काही महिने काँग्रेस पक्षातच राहिले. तरीही त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा गेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ते प्रवेश करणार असल्याची चर्चा लोकसभा निवडणुकीदरम्यान सुरू होती. अखेर सत्ताधारी पक्षातच जायचे तर मग शिंदे यांच्या सेनेत जाण्यापेक्षा थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय वरपुडकरांनी घेतला. संपूर्ण हयात काँग्रेस, राष्ट्रवादीत घालवलेल्या वरपूडकरांनी आपल्या राजकीय आयुष्याच्या उत्तरार्धात थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश करून मोठाच ‘यु टर्न’ घेतला आहे.
सध्या जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्याकडे आहे. वरपुडकरांच्या प्रवेशाला बोर्डीकरांची हरकत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात होते तथापि वरपूडकर यांनी भाजपच्या नेतृत्वाची भेट घेतली तेव्हा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे बोर्डीकरही उपस्थित होते. त्यामुळे हा मुद्दाही निकाली निघाला आहे.
काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या वरपूडकरांनी आपली काँग्रेस विषयी कोणतीही नाराजी नाही असे स्पष्ट केले आहे. विकास कामे करून घ्यायची असतील आणि कार्यकर्त्यांनाही बळ द्यायचे असेल तर सत्ताधारी पक्षात जाण्याशिवाय पर्याय नाही. कार्यकर्त्यांच्या भावनेमुळे आपण हा निर्णय घेतल्याचे वरपूडकर यांनी स्पष्ट केले आहे.