सर्वसामान्य जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास केंद्रातील भाजप सरकार गेल्या दोन वर्षांत अपयशी ठरल्याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला असला, तरी काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष करीत राहील, असे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांनी सांगितले. माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया व कैलास गोरंटय़ाल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवडणुकीच्या वेळेस दिलेल्या आश्वासनांचा या सरकारला विसर पडला आहे. उत्पादन खर्च आणि त्यावर ५० टक्के अधिक मोबदला देण्याचे आश्वासन देणारे भाजप सरकार आता शेतक ऱ्यांच्या मालास तेवढा हमीभाव देण्यास मात्र तयार नाही. एवढेच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना सरकारने बंद केल्या आहेत. जीवनाश्यक वस्तूंची महागाई दूर करून भाव नियंत्रणात ठेवणे या सरकारला जमले नाही. काळा पैसा देशात परत आणण्याचे कामही सरकार करू शकले नाही.
सध्या सर्वसामान्य माणसांपुढील अडचणी वाढत चालल्या आहेत. दलित, आदिवासी, महिला, अल्पसंख्य समाजासाठी विविध योजना, सवलती आणि निधीमध्ये कपात करण्यात आली. वारेमाप घोषणा करायच्या, आश्वासने द्यायची. परंतु प्रत्यक्षात सामान्य जनतेला दिलासा देणारे निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी करायची नाही, अशी केंद्र सरकारच्या संदर्भात स्थिती असल्याचे जिल्हा काँग्रेसने म्हटले आहे. सत्संग मुंढे, आर. आर. खढके, विजय कामड, राम सावंत, विमल आगलावे आदी पदाधिकारी मोर्चात सहभागी होते.