२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे घोडा मैदान जवळ आले आहे. अशात भाजपाने या दोन्ही निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसून तयारी सुरु केली आहे. मात्र काँग्रेसने भाजपाला रोखण्यासाठी महाआघाडीचा चक्रव्यूह रचण्यासाठी रणनीती आखली आहे. कर्नाटकमध्ये झालेली विधानसभा निवडणूक आणि पालघरची पोटनिवडणूक यानंतरच्या समीकरणानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्षांची मोट बांधून भाजपाविरोधात महाआघाडी करण्याचा निर्धार काँग्रेसने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना या संदर्भात अहवालही देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी, बसपा, सीपीएम, रिपाई(प्रकाश आंबेडकर) या समविचारी पक्षांसोबत महाआघाडी करण्यासंदर्भात काँग्रेस तयार असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. देशात नरेंद्र राज्यात नरेंद्र ही भाजपाची मोहीम २०१९ साठीही आहे. मात्र भाजपाचे हे स्वप्न पूर्ण होऊ नये म्हणून काँग्रेसने महाआघाडी करण्याचे ठरवल्याचे दिसून येते आहे.

काँग्रेसची यासंदर्भात एक बैठक पार पडली या बैठकीत हा विचार मांडण्यात आल्याचे समजते आहे. कर्नाटकमध्ये जेडीएस, काँग्रेस आणि बसपा एकत्र लढले असते तर १८० जागा मिळाल्या असत्या. वेगळे लढलो तर मतविभाजन होईल, ज्याचा फायदा भाजपाला होऊ शकतो त्यामुळे एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीत महाराष्ट्रातल्या कोणत्या जागांवर काँग्रेसचे प्राबल्य आहे आणि कोणत्या जागांवर राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे त्यावरही चर्चा झाली. एक जागा एक उमेदवार हे सूत्र ठरवले तर महाआघाडीला निश्चित फायदा होईल असेही मत या बैठकीत मांडले गेले. २०१९ च्या दोन्ही निवडणुकांसाठी ही रणनीती आखण्यात येत असल्याचे समोर आले आहे. सगळ्या समविचारी पक्षांची आघाडी झाली तर भाजपापुढे आव्हान निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress plans unity with all opposition parties in maharashtra says ashok chavan
First published on: 09-06-2018 at 20:20 IST