सांगली : माझ्यावर शिस्तभंगाच्या कारवाई करतांना सही करणार्‍यांनी आपले काँग्रेससाठी योगदान किती याचे आत्मपरिक्षण करावे असे आव्हान काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी शुक्रवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केले. सांगलीत गुरूवारी झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशाल पाटील यांच्यावर कारवाई टाळत केवळ याबाबतचा अहवाल दिल्लीला पाठविला जाणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा >>> सोलापुरात सोमवारी एकाच दिवशी नरेंद्र मोदींसह उद्धव ठाकरे व शरद पवारांच्या सभा

मात्र, यावर आज विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी विशाल पाटीलांना वय लहान आहे, भविष्याचा विचार करून निर्णय घेण्याचा सल्ला दिला. तर शिवसेनेकडून पाटील यांच्यावर कारवाईसाठी काँग्रेसवर दबाव वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर माध्यम प्रतिनिधींनी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी पक्षाचा कोणताही नियमभंग केलेला नाही.  माझ्यावर कारवाई करताना, त्या पत्रावर सही करणार्‍यांनी आपले काँग्रेससाठी योगदान काय हे पाहावे. ते आमच्या कुटुंबापेक्षा जास्त आहे का हे तपासावे, आणि त्यांनी कारवाई खुशाल करावी. आमच्या कुटुंबातील स्व. वसंतदादा पाटील यांनी राज्यात एकहाती कॉग्रेसची सत्ता आणली होती. हे लक्षात घ्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.