आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांच्यासह तब्बल ४० जणांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे मागील काही दिवसांमध्ये अनेकदा पंतप्रधान मोदींची स्तुती करणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांना देखील काँग्रेसने आपल्या स्टार प्रचाराकांच्या यादी स्थान दिले आहे. याशिवाय मल्लिकार्जुन खरगे, गुलामनबी आझाद, ज्योतिरादित्य सिंधिया या दिग्गजांचाही यात समावेश आहे.

याचबरोबर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, मुकुल वासनीक, अविनाश पांडे, राजीव सातव, रजनी पाटील, सचिन पायलट, विजय वडेट्टीवार यांचा देखील समावेश करण्यात आला आहे