माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या मुलांनी अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी लातूरमधून मोठा विजय मिळवला आहे. अमित देशमुख यांनी लातूरमधून तर धीरज देशमुख यांनी लातूर ग्रामीणमधून विजय मिळवला. धीरज देशमुख यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवल्याचं समोर आलं आहे. त्यांनी तब्बल १ लाख १९ हजार मतांनी शिवसेनेच्या सचिन देशमुख यांचा पराभव केला.
अमित देशमुख यांनी भाजपाच्या शैलेश लाहोटी आणि धीरज देशमुखांनी सचिन देशमुखांचा पराभव करत लातूर आपल्या पारड्यात पाडून घेतलं. माजी राज्यमंत्री दिलीप देशमुख, विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख, अमित देशमुख, अदिती देशमुख, अभिनेता रितेश देशमुख, तसंच अभिनेत्री आणि रितेश देशमुख याची पत्नी जेनेलिया देशमुख यांनी या दोघांच्याही प्रचारासाठी लातूरमध्ये तळ ठोकला होता. तसंच त्यांनी मोठ्या प्रमाणात अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांचा प्रचार केला होता.
मतदानाच्या दिवशी जेनेलिया देशमुख हिनं विलासराव देशमुख यांची आठवण काढली होती. जेनेलियाला लातूरमध्ये पडत असलेल्या पावसाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने ‘लातूरमध्ये पडणारा पाऊस हा माझ्या सासऱ्यांचा आशीर्वाद आहे असे मला वाटते. हा खरंतर खूप चांगला दिवस आहे’ असे जेनेलिया म्हणाली होती. विलासराव देशमुखांचा गड म्हणून लातूर मतदारसंघ ओळखला जातो. या मतदारसंघावर पकड कायम ठेवण्यासाठी विलासरावांनी साखर कारखाने उभे केले. ग्रामीण अर्थचक्र गतिमान केले. मतदारांशी त्यांची नाळ जुळलेली होती. त्यांच्या हयातीतच २००९ मध्ये त्यांनी राजकारणाची सूत्रे आपले ज्येष्ठ पुत्र अमित देशमुख यांच्या हाती दिली व ते ९९ हजार मतांनी लातूर शहर मतदारसंघातून निवडून आले. लातूर ग्रामीण मतदारसंघातून विलासरावांनी तेव्हा वैजनाथ शिंदे या कार्यकर्त्यांस उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणले होते.
२०१४च्या मोदी लाटेतही शहरातून अमित देशमुख तर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांना उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी त्र्यंबक भिसे यांना उमेदवारी दिली व त्यांना निवडून आणले. नंतर झालेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका अशा निवडणुकांत काँग्रेसची पडझड सुरू झाली व बाभळगावच्या गढीला धक्के बसण्यास सुरुवात झाली. विलासरावांइतकी त्यांच्या मुलाची नाळ जनतेशी नाही ही चर्चाही जोर धरू लागली होती.