काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलताना पटोलेंनी “२०० आमदार, ३५० खासदार असे सत्तापिपासू भाजपाचे उद्दिष्ट असते. आमचे उद्दिष्ट हे जनतेचे काम आहे.” असं म्हटलं आहे. तर, “विरोधात असताना भाजपावाले महागाई विरोधात बेंबीच्या देठापासून ओरडायचे.” असं म्हणत त्यांनी महागाईवरून भाजपावर निशाणा साधला आहे.

पत्रकारपरिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले “आमचं उद्दिष्ट हे ग्रामपंचायत निवडणूक नाही. आमचं उद्दिष्ट हे महाराष्ट्राच्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत दिली गेली पाहिजे. रस्त्यांवरील खड्डे तातडीने दुरूस्त केले गेले पाहिजेत. बेरोजगारांबद्दलची भूमिका स्पष्ट करून तातडीने नोकरभरती केली पाहिजे. याशिवाय ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था करून पंतप्रधानांच्या जन्मदिनी एक तरूण शेतकऱ्याने जी आत्महत्या केलेली आहे, त्यातूनही बोध सरकारने घेतला पाहिजे हीच काँग्रेसची मागणी आहे.”

तर महागाईच्या मुद्द्य्यावरून टीका करताना पटोलेंनी सांगितले की “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, राज्य सरकारनेच आता महागाई कमी करण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत. परंतु अजुनपर्यंत राज्यात ज्या पद्धतीने महागाईचा डोंगर वाढत चालेला आहे. राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे, कारण ज्यावेळी ते राज्यात विरोधात होते तेव्हा फार बेंबीच्या देठापासून ओरडत होते. मग आता का महागाईबद्दल बोलत नाहीत, का गप्पा आहेत? हा सवाल काँग्रेसच्यावतीने मी उपस्थित करतो आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय “अजूनपर्यंत पालकमंत्र्यांची नेमणूक झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील विकासकामे थांबलेली आहेत. राज्यातील ईडी सरकार हे महाराष्ट्राच्या विध्वंसासाठी तयार झालं आहे का?, महाराष्ट्रात विध्वंस करण्याची त्यांची मानसिकता आहे का? हा प्रश्न देखील निर्माण होतोय.” असंही यावेळी पटोले यांनी म्हटलं आहे.