Maharashtra Lockdown: राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाउन १ जून रोजी संपत असून तो पुन्हा वाढवला जाणार की उठवला जाणार यासंबंधी चर्चा सुरु आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सध्या राज्य सरकारकडून तयारी सुरु असून त्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन वाढवला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“रेड झोनमधील गावांना सध्या कोणताही धोका पत्करण्याची गरज नाही. त्या जिल्ह्यात जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या तालुक्यांमध्ये कडक निर्बंध करावेत आणि ज्या तालुक्यात रुग्ण नाही तिथे थोडी सवलत द्यावी. तसंच बाकीच्या जिल्ह्यात मात्र टप्प्यापटप्य्याने लॉकडाउन कमी करावा आणि शिथीलता द्यावी असा विचार असून त्यादृष्टीने पाऊल टाकत आहोत,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

“लॉकडाउन कधीही उठू शकतो, पण…,” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं महत्वाचं विधान

मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच राहणार
“मुंबईची लोकल सुरु करु नका कारण तिथे करोनाचा मोठा फैलाव होण्याची शक्यता असते, त्यामुळे रेल्वेत जी गर्दी होते त्याचा गांभीर्याने विचार व्हावा अशी अनेकांची मागणी आहे. म्हणून आम्ही अत्यावश्यक सेवा सोडून कोणालाही लोकलने प्रवास करण्याची परवानगी देणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

“महाराष्ट्रात लॉकडाउन सरसकट उठवणं अडचणीचं ठरेल”
“राज्यात ३१ तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे. राज्यातील १५ जिल्हे असे आहेत जिथे पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. काही जिल्ह्यात तीन ते पाच टक्के प्रमाण आहे. सरसकट लॉकडाउन उठवता येत नाही. परिस्थितीचा आढावा घेऊनच लॉकडाउनसंदर्भात निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाउन सरसकट उठवणं अडचणीचं ठरेल. निर्बंध शिथील करण्यासंबंधी मुख्यमंत्री ३१ मे च्या आधी निर्णय घेतील,” असं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं आहे –
महाराष्ट्रात करोना स्थितीसंबंधी विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले होते की,“सध्याचा करोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे. सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील करु तेव्हा मागील अनुभवातून शहाणं व्हावं लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील,” असंही ते म्हणाले. दरम्यान लॉकडाउन वाढणार का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कोणीही गाफील राहू नये”.