कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वपक्षीय नेते रस्त्यांवर उतरून सभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीं, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रत्यक्षात कर्नाटकात हजर राहत रॅलींना संबोधित केलं आहे. अटीतटीच्या ठरलेल्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण, या निवडणुकीच्या निकालावर देशभरातील इतर राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल स्पष्ट होणार आहे. दरम्यान, कर्नाटकात काँग्रेसच जिंकेल असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवार यांनी आज पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेतली.
“दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, बंगालमध्ये भाजपाची सत्ता नाही. देशाचा नकाशा पाहिलास अनेक राज्यात भाजपा सत्तेवर नाही. इतर राज्यात नॉन भाजपा सरकार आहे”, असं शरद पवार म्हणाले. “कर्नाटकमधील स्थानिक लोक भाजपावर नाराज आहेत, त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येणार”, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
…तर आश्चर्य वाटतं- शरद पवार
“आपण धर्मनिरपेक्ष संकल्पना स्वीकारली आहे. निवडणुकीला उभं राहताना आपण ही शपथ घेतो. त्याल लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख आहे. निवडणुकीत एखादा धर्म किंवा धार्मिक प्रश्न उभं करणं आणि त्यातून वेगळं वातावरण तयार करणं हे देशाच्या दृष्टीने चुकीचं आहे. देशाचे पंतप्रधान धर्माचा आधार घेऊन घोषणा देतात याचं आश्चर्य वाटतं”, असंही ते म्हणाले.
हेही वाचा >> सुप्रिया सुळेंना पक्षात मोठी जबाबदारी देणार? शरद पवार म्हणाले, “एका वर्षात…”
संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. त्यावरूनही शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, कोणीतरी सिरियस (महत्त्वाचं) बोलण्यात ज्यांचा लौकीक आहे अशा लोकांना उत्तर द्यावं. या पोरासोरांच्या वक्तव्यावर काय बोलणार.
तर, दुसरीकडे सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचं म्हटलं जातंय. यावर त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, सुप्रिया सुळेंची वेगळी इच्छा आहे. एका वर्षात लोकसभा निवडणूक आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की, लोकसभेची निवडणूक होईपर्यंत मतदारांव्यतिरिक्त कोणतीही जबाबदारी घेण्यास त्या इच्छूक नाहीत.
 
  
  
  
  
  
 