कृषी वीजपंपांची जोडणी जूनअखेरीस पूर्ण करावी अन्यथा, दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंड आकारावा, अशी तंबी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीप्रसंगी पालकमंत्री मुनगंटीवार बोलत होते. बैठकीत खासदार रामदास तडस, आमदार रणजित कांबळे, डॉ.पंकज भोयर, समीर कुणावार व अमर काळे उपस्थित होते.
या बैठकीच्या दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीपंप वितरण व जलयुक्त शिवार योजनेच्या कामाबाबत तीव्र नाराजी नोंदविली होती. संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचीही सूचना त्यांनी केली होती. या पाश्र्वभूमीवर पालकमंत्र्यांनी पुन्हा तंबी दिली आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी ६०५ कोटी रुपये कर्जपुरवठा करण्याचे नियोजन आहे. गत वर्षांच्या खरीप हंगामात ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी घोषित झाली असल्याने जिल्ह्यातील सर्व बँकांनी शेतकऱ्यांना अग्रक्रमाने कर्जपुरवठा करावा, अशीही सूचना पालकमंत्र्यांनी केली. कर्ज पुनर्गठनासाठी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना बँकांनी सुलभपणे कर्जपुरवठा करावा, अधिक उगवण असलेली बियाणे उपलब्ध करून द्यावी, खताची टंचाई भासू नये म्हणून पुरवठादार कंपन्यांना सतर्क करावे, नियमाप्रमाणे खतांची विक्री करावी, खत पुरवठादारांनी कृषी विभागाशी समन्वय साधून वेळेत पुरवठा करावा, बदलत्या वातावरणाचा अभ्यास करून पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, मध्यप्रदेश सरकारचे सूत्र डोळ्यापुढे ठेवावे व या कार्यात पाणीवाटप संस्थांनाही विश्वासात घ्यावे, अशाही सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
सन २०१५-१६ च्या खरीप हंगामात ४ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. त्यात ज्वारी- ४ हजार २१० हेक्टर, कापूस- २ लाख ३८ हजार, सोयाबिन- १ लाख १० हजार, भुईमूग- ८००, तूर- ५५ हजार ६००, मूग- ७००, उडीद- ५५०, तीळ- १५० हेक्टर, असे पिकनिहाय पेरणीक्षेत्र राहणार आहे. जिल्ह्य़ास एकूण ८० हजार ६९ क्विंटल बियाण्यांची गरज आहे. तसेच ७७ हजार २५० मेट्रीक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी यावेळी दिली. बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चित्रा रणनवरे, उपाध्यक्ष विलास कांबळे, विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे, जिल्हाधिकारी संजय भागवत सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Connect farming water pump june end
First published on: 06-05-2015 at 08:07 IST