आरोग्य विभागाने घेतलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यात जिल्ह्य़ातील तब्बल ३१४ गावे दूषित पाण्यावर तहान भागवत असल्याचे आढळून आले. त्यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होत असून, अलीकडेच डेंग्यूचे रुग्णही आढळून आले आहेत.
जुलै महिना सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. पावसाअभावी पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र होऊ लागला आहे. दुसरीकडे उपलब्ध पाण्याचे काही स्रोत दूषित आहेत. त्यामुळे नाइलाजाने ग्रामस्थांवर दूषित पाण्यावरच गुजराण करण्याची वेळ आली आहे. जि.प. आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असता २८ टक्के नमुने दूषित आढळले. जवळपास ३१४ गावांत आजही ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागते. जिल्हय़ात गेल्या काही दिवसांमध्ये साथरोगांचे प्रमाणही वाढले आहे. डेंग्यूचे रुग्णही आढळून आले आहेत. घाणीचे साम्राज्य व दूषित पाणी यामुळे साथरोगांचे प्रमाण वाढत आहे. ३१४पकी २८ गावे अतिजोखमीची म्हणून समोर आली आहेत.
यापूर्वीही जि.प. आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाण्याचे नमुने घेतले होते. या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायतींना योग्य त्या सूचना देऊन पाण्याचे स्रोत अधिक शुद्ध कसे करायचे, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. मात्र, ग्रामपंचायतींनी याचे महत्त्व ओळखले नाही. परिणामी, आजही ग्रामस्थांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. अशा ग्रामपंचायतींना आता रेडकार्ड देण्यात आले. शुद्ध पाणीपुरवठा करण्यासंदर्भात आरोग्य विभागाकडून सूचना देण्यात आल्या.
उस्मानाबादेत पेरण्यांसाठी आणखी पावसाची प्रतीक्षा, परंडा कोरडाठाक
वार्ताहर, उस्मानाबाद
पावसाळ्याचा पहिला महिना पावसाविनाच सरला. जिल्ह्यात आतापर्यंत २०६.०१ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. परंडा तालुका मात्र कोरडाच आहे. या तालुक्यात केवळ २.२ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील खालावलेली पाणीपातळी वाढण्यासाठी, तसेच काही ठिकाणी खोळंबलेल्या पेरण्या मार्गी लागण्यासाठी शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
मागील सलग ३ वर्षांपासून जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी साडेसातशे मिमी असून, मागील ३ वर्षांमध्ये कधीच सरासरीएवढा पाऊस पडला नाही. त्यामुळे बहुतांश ठिकाणी मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी लक्षणीय खालावली. मागील ३ वर्षांपासून सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.
मृग व आद्र्रा नक्षत्रांनी हुलकावणी दिली. खते, बी-बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांना पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करावी लागली. पुनर्वसू नक्षत्रास प्रारंभ झाल्यानंतर जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात का होईना पावसाने हजेरी लावली. आजपर्यंत जिल्ह्यात २०६.०१ टक्के पाऊस झाला. यात उस्मानाबाद तालुक्यात ३५.६, तुळजापूर ३६.६, उमरगा ४५.२, लोहारा २८.१, कळंब २८.५, भूम २०.६, वाशी ९.३ तर परंडय़ात २.२ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात आजपर्यंत सर्वाधिक पाऊस उमरगा तालुक्यात ४५.२ मिमी झाल्याची नोंद असून सर्वात कमी पावसाची नोंद परंडय़ात २.२ मिमी झाली. गेल्या दोन दिवसांतील जिल्ह्यातील पावसाची सरासरी ८८.८ टक्के आहे. परंडा तालुक्यात केवळ दोन टक्के पाऊस झाला. तालुक्यातील बहुतांश ठिकाणी पेरण्या होऊ शकल्या नाहीत.
हिंगोलीत पावसाची प्रतीक्षाच; चाराटंचाईने पशुधन संकटात
वार्ताहर, हिंगोली
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गेल्या महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा कायम आहे. धरणांतील पाणीसाठा कमी झाला असून, ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच चारा उपलब्ध आहे. मंगळवारी रात्री जिल्ह्यात पावसाने नाममात्र हजेरी लावली. महिन्याभरात पडलेल्या एकूण पावसाची सरासरी ३.९९ टक्केच असून, गतवर्षी याच तारखेपर्यंत ती ४१.३६ होती. पेरण्या खोळंबल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे आहेत.
दि. ९ जुलैपर्यंत पडलेल्या एकूण पावसाची नोंद १७३.७० मिमी आहे. जिल्ह्यात मंगळवारी रात्री पडलेला पाऊस, आतापर्यंतचा एकूण व कंसात वार्षिक सरासरी मिमीमध्ये : िहगोली ८.८६, २९.४३ (४०६.४८), वसमत ८.८६, २४.५७ (३३८.०६), कळमनुरी ४.८३, २५.८७ (३२२.०६), औंढा नागनाथ ९.२५, ४८.५० (४१२.६२), सेनगाव ८.८३, ४५.३३ (३४२.६१). जिल्ह्यातील एकूण पावसाची नोंद १७३.७० (१८२१.८३).
पावसाअभावी धरणांतील, लघुप्रकल्पांतील साठा कमी झाला असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तीव्र होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात तीन धरणांत असलेल्या पाणीसाठय़ाची आजची स्थिती : येलदरी- मृतसाठा १२४.६७७ दलघमी, जिवंत साठा ३२०.८३७, एकूण ४४५.५१४, टक्केवारी ३९.६४. सिद्धेश्वर- मृतसाठा १४४.३०० दलघमी, जिवंत साठा ०, एकूण १४४.३००, टक्केवारी ०. ईसापूर धरण- मृतसाठा ३१४.९६३७ दलघमी, जिवंत साठा ४२३.३१४५, एकूण ७३८.२७८२, टक्केवारी ४३.९०७८. जिल्ह्यातील २६ लघु प्रकल्पांपैकी १३ प्रकल्पांत शून्य टक्के पाणीसाठा असून, १३ प्रकल्पांमध्ये ० ते २५ टक्के आहे.
जिल्ह्यातील पशुधनाची संख्या ३ लाख ६३ हजार ८७४ आहे. यात लहान पशूंची संख्या ६० हजार ६६४, मोठे ३ लाख ३ हजार २१० आहे. लहान पशूंना प्रतिदिन १८१ कि.ग्रॅ. चारा दरडोई, तर मोठय़ा पशूंना प्रतिदिन दरडोई २ हजार कि.ग्रॅ.चारा आवश्यक आहे. जिल्ह्यात ७ लाख २० हजार ३६० मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. उपलब्ध होणाऱ्या चाऱ्याची स्थिती : खरीप पिकांपासून ४ लाख ३७ हजार ८४६, रब्बी पिकांपासून २ लाख २१ हजार ७४१ अपेक्षित, उन्हाळी उत्पादनापासून १९ हजार २७४ पशुधन खात्याच्या विविध विकास कार्यक्रमांतून १९ हजार ७० असा एकूण ६ लाख ९७ हजार ९७१.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contamination water supply in beed district
First published on: 10-07-2014 at 01:05 IST