रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे.  मागील २४ तासात जिल्ह्यात ८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. कुडंलिका नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अलिबाग- ४५ मिमी, पेण – ८० मिमी, मुरुड – १५४ मिमी, पनवेल – ९२ मिमी, उरण – १५५ मिमी, कर्जत – ४७ मिमी, खालापूर – ६५ मिमी,  माणगाव – ८२ मिमी, रोहा-१०७ मिमी, सुधागड-५० मिमी, तळा – १४१ मिमी, महाड- ४२ मिमी, पोलादपूर- ५८ मिमी, म्हसळा- ४८ मिमी, श्रीवर्धन- ८७ मिमी, तर माथेरान येथे ४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पावसाचा जोर अजूनही कायम आहे. सकाळ पासूनच पावसाच्या मध्यम ते तीव्र सरी कोसळत आहेत. त्यामुळे सखल भागात पाणी साचणे, वीज पुरवठा खंडीत होणे यासारख्या घटना घडल्या आहेत. नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. कुंडलिका नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे, सकाळी १० वाजता तिची पाणी पातळी २२.९० मीटर होती. त्यामुळे नदीकिनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरी १ हजार २०६ मिलीमीटर पाऊस पडतो, १६ जुलै पर्यंत जिल्ह्यात सरासरी ७५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.