सावंतवाडी : वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी गावात, कासव संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर, एका वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. येथील रहिवाशी जिल्हा सौ. सुष्मिता सुनील साळगावकर आणि सौ. सावी साळगावकर यांनी जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.वायंगणी येथे समुद्र किनारा जवळ खरेदी केलेल्या जागेवर समुद्रापासून केवळ २० मीटरपेक्षा कमी अंतरावर वाळूचा बेकायदेशीर बंधारा बांधला असून त्यावर काटेरी कुंपण घातले आहे. यामुळे, अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांना मोठा अडथळा निर्माण होऊन त्यांच्या जिवांना धोका निर्माण झाला आहे.
हे कृत्य किनारी नियमन क्षेत्र (CRZ) कायद्याचे उल्लंघन असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे. तक्रारीनुसार, समुद्रकिनाऱ्याची मोठ्या प्रमाणात खोदाई करून पर्यावरणास हानी पोहोचवली जात आहे. यामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला असून, किनारपट्टीची धूप वाढली आहे.
कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाईची मागणी:
स्थानिक रहिवाशी सौ सुष्मिता साळगावकर व सौ सावी साळगावकर यांनी या संदर्भात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक आणि महाराष्ट्र राज्य किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे निवेदने दिली आहेत. त्यांनी वायंगणी ग्रामपंचायत प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ग्रामपंचायतीने CRZ नियमांचे उल्लंघन होत असतानाही कोणतीही परवानगी किंवा ना-हरकत दाखला देऊ नये, अशी त्यांची मागणी आहे. या प्रकरणात कोणतीही कारवाई न झाल्यास, बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
कायद्याचे उल्लंघन आणि गंभीर आरोप:
स्थानिक लोकांच्या मते, ही जमीन १९९६-९७ पासून बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी करण्यात आली आहे आणि यासंदर्भात न्यायालयात दावा दाखल करण्याची तयारी सुरू आहे. जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या पतीवर यापूर्वी दाभोली गावात अशाच प्रकारच्या जमीन व्यवहारातून आरोप झाले आहेत.वायंगणी गावात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत आणि प्रशासनाने तातडीने कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.