किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर पुस्तक पुजनावरून दोन गटात वाद निर्माण झाला. पुस्तक पुजनाच्या बहाण्याने गडावर अस्थिविसर्जनाचा घाट घातला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत पुस्तक आणि पुजनासाठी आणेलेले साहित्य, राखसदृश्य घटक ताब्यात घेतले. या राखेची फॉरेन्सिक चाचणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

किल्ले रायगडावर बुधवारी काही जण शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ पुस्तक पुजन करत होते. मात्र यावेळी त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे तिथे उपस्थित असलेल्या शिवप्रेमींच्या लक्षात आले. त्यावर हे तुम्ही काय करत आहात म्हणून त्यांनी त्यांना जाब विचारला. यावरून दोन्ही गटात वाद निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटांना रोखले. तसंच पुस्तक आणि पुजनासाठी आणलेले साहित ताब्यात घेतले.

पुस्तक पुजनाच्या निमित्ताने अस्थिंचे शिवसमाधीजवळ विसर्जन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप यावेळी काही शिवप्रेमींनी केला. त्यामुळे काही काळ गडावर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील वाद टळले. मात्र या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी कऱण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे.