अहिल्यानगर: श्रीरामपूरमधील अशोक साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत प्रथमच माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना ऊस भावावरून साईसंस्थानचे माजी विश्वस्त प्रताप भोसले व शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे या दोघांनी थेट आव्हान दिले. यामुळे मुरकुटेंसह समर्थकांनी त्यांना मज्जाव केल्याने मोठा गोंधळ उडाला. शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्याभोवती कडे करत त्यांना संरक्षण दिले. पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला.
अशोक कारखान्याची ६७ वी सभा कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष बाबासाहेब आदिक, गिरीधर आसने, दीपक पटारे, काॅ. श्रीधर आदिक, कार्यकारी संचालक संतोष देवकर, वंदना मुरकुटे, हिराबाई साळुंखे, मंजुश्री मुरकुटे, सुनीता गायकवाड व संचालक उपस्थित होते. गेल्यावेळच्या २७०० रुपये भावावरून असलेली नाराजी व चालू हंगामातील भाव यावरून ही सभा वादळी झाली.
ॲड. काळे व भोसले यांनी ऊस भावावरून मुरकुटे यांना आव्हान देताच मुरकुटे समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे एकच गोंधळ उडाला. मुरकुटे व काळे समर्थक व्यासपीठाच्या दिशेने धावले. काळे यांना संरक्षक कडे उभे करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी हस्तक्षेप केला. मात्र, मुरकुटे यांनी आक्षेप नोंदविला. काळे यांना बोलू न दिल्याने त्यांच्यासह समर्थकांनी सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सभागृहात मुरकुटे यांनी ज्ञानेश्वर, मुळा, गणेश कारखान्यांच्या भावाशी तुलना करत आरोप खोडून काढले.
भंगार चोरीत गोलमाल
ॲड. काळे व भोसले यांनी निषेध सभा घेत कारखाना व्यवस्थापनातील त्रुटींवर साखर संचालकांकडे तक्रार करणार आहोत. कारखान्यात चोरी झालेल्या भंगारप्रकरणी केवळ ५० हजारांची गुन्ह्यात नोंद करण्यात आली आहे, ही रक्कम काही लाखांत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी शेतकरी तुमचे ऐकत होते. आता सर्वांना हिशेब कळायला लागला आहे. आगामी निवडणुकीत आपण पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
विखे समर्थकांची उपस्थिती
विखे समर्थक दीपक पटारे यांच्यासह गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे व्यासपाठीवर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मुरकुटे यांनी बोलताना दीपक पटारे यांच्या आपण पाठीशी होतो. त्यावेळी ते स्वकर्तृत्वावर सभापती झाले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या ते फार जवळचे आहेत. भोसले यांचेही मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहे. या दोघांनीही सोबत आल्यास त्यांचा निश्चित फायदा होईल. कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगितले.