पंढरपूरमध्ये मतमोजणीसाठी करोना चाचणी बंधनकारक

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

vote-Counting
(संग्रहित छायाचित्र)
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

पंढरपूर: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लागू केले आहेत. मतमोजणी केंद्रात येणारे प्रतिनिधी व इतरांची करोना चाचणी बंधनकारक आहे.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्वतयारीबाबत पत्रकार परिषद आयोजित केली होती.या वेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुशील बेल्हेकर, स्वप्निल रावडे, पोलीस निरीक्षक अरुण पवार उपस्थित होते.

या निवडणुकीमध्ये ३ लाख ४० हजार ८८९ मतदारांपैकी २ लाख २४ हजार ६८ मतदारांनी मतदान केले आहे. मतमोजणीसाठी ११८ अधिकारी,कर्मचारी व  मदतनीस यांची नियुक्ती केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. मतमोजणी रविवारी २ मे रोजी होणार आहे.  शासकीय धान्य गोदाम येथे सकाळी ८ वाजल्यापासून ही मतमोजणी  होणार आहे. १४ टेबलांवर ३८  फेऱ्यात ती पार पडणार आहे. मतमोजणीसाठी ६ टेबल राखीव ठेवण्यात आले आहेत. टपाली मतदानाची मोजणी दोन टेबलवर होणार आहे. या साठी दोन टेबल राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच ११८ अधिकारी, कर्मचारी व मदतनीस  यांची नियुक्ती केली आहे. टपाली मतदानाद्वारे ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदी ३ हजार २५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाआहे. तसेच ७३ सैनिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याचेही गुरव यांनी सांगितले.

मतमोजणी केंद्रात येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने व त्यांच्या प्रतिनिधीने तसेच इतरांनी करोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ज्यांनी करोना चाचणी केली नाही अशा संबंधितांसाठी  मतदान कक्षाबाहेरील आरोग्य कक्षात चाचणी केली जाईल. तपासणी अहवाल निगेटिव्ह असल्यास त्यांनाच केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. वाढता करोना प्रादुर्भाव पाहता मतमोजणी कक्षा बाहेरील क्षेत्रात फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी, निवडणूक निकाल ध्वनिक्षेपकाद्वारे जाहीर करण्यात येणार नाही. तो फक्त मतमोजणी कक्षात जाहीर करण्यात येईल.

फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी तसेच निकाल सोलापूर आकाशवाणी केंद्रावरून वेळोवेळी प्रक्षेपित करण्यात येईल. तसेच फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी तसेच निकालासाठी वोटर हेल्पलाईन अ‍ॅपचा  वापर करूनही पाहता येईल असे त्यांनी सांगितले.

मतमोजणीच्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ लावण्यात आले असून त्यानुसार मतमोजणीवर नजर राहणार आहे. तसेच या ठिकाणी व्हिडीओ कॅमेऱ्याद्वारे चित्रिकरणही करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांना मोबाइल वापरण्यास बंदी आहे,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona test mandatory for admission to the counting center in pandharpur zws