सोलापूर शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला असताना आता जवळच असलेल्या अक्कलकोटमध्ये देखील करोना विषाणूने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. तेथील एका व्यापाऱ्याचा मृत्यूनंतर करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

अक्कलकोटच्या मधला मारूती भागात राहणाऱ्या एका  व्यापाऱ्याला चार दिवसांपूर्वी निमोनियाचा त्रास सुरू झाल्याने,  सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले  होते.  या ठिकाणी  उपचार सुरू असताना त्याची करोनाशी संबंधित चाचणी घेण्यात आली होती. परंतु त्याचा अहवाल प्राप्त होण्याआधीच त्याचा गुरुवारी २१ मे, रोजी मृत्यू झाला. या नंतर  काल (शुक्रवार) रात्री उशिरा  त्यांचा चाचणी अहवाल प्राप्त झाला.  यामध्ये व्यापाऱ्याला करोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाल्याचे प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी सांगितले आहे.

आणखी वाचा- सोलापुरात ३२ नव्या करोनाबाधितांची नोंद; एकूण रुग्णसंख्या ५४८ वर

मृत व्यापाऱ्याचा फरशी व्यापाराच्या निमित्ताने अक्कलकोट शहर तालुक्यात नित्याचा संपर्क होता. मैंदर्गीसारख्या नगरपरिषदेचे ठिकाण असलेल्या शहरातही त्याचे जाणे-येणे होते. यातून त्याचा अनेक व्यक्तींशी संपर्क आला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, यापैकी काही व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.