राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही कधी करोनामुक्त झालेल्यांपेक्षा कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. तर, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत मात्र रोज भर पडतच आहे. दरम्यान, राज्यात आज दिवसभरात ४ हजार २१ रूग्ण करोनामुक्त झाले असून, ३ हजार १३१ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याचबरोबर, ७० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६३,४४,७४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,२७,६२९ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३८६१६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,७३,०७,८२५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,२७,६२९ (११.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,७२,०९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४०,७१२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.