नीरज राऊत 
पालघर: अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे गेल्या हंगामामध्ये पालघर जिल्ह्यातील चिकू बागायतदारांचे झालेले नुकसान मार्च- एप्रिल महिन्यात नव्याने सुरू होणाऱ्या हंगामामध्ये भरून निघेल अशी आशा करोना परिस्थितीने धुळीत मिळवली आहे. गेल्या चौदा दिवसापासून बाजारपेठ बंद असल्याने चिकुनी भरलेली झाड डहाणू तालुक्यात ठिकाणी दिसून येत आहे. पिकलेल्या चिकूचे घडे झाडावरून निखळून पडत असून सुमारे पाच हजार टन चिकू सध्या वाड्यांमध्ये सडत असल्याचे चित्र डहाणू तालुक्यातील दिसून येत आहे.

डहाणू तालुक्यात चार हजार हेक्‍टरवर अंदाजे पाच लक्ष चिकू झाडांची लागवड असून संचारबंदी सुरू होण्यापूर्वी या ठिकाणाहून दररोज अडीचशे ते तीनशे टन चिकू राज्यातील विविध शहरातील तसेच उत्तरेकडील राज्यात पाठवले जात होता. संचारबंदी सुरु झाल्यानंतर तसेच विविध ठिकाणची बाजारपेठा बंद झाल्या. त्याचबरोबरीने चिकू झाडावरून काढण्यासाठी येणाऱ्या मजुरांची परवानगी घेण्यास अवधी लागल्याने झाडावर तयार झालेला चिकू निखळून पडू लागला आहे. डहाणू येथील चिकू लिलाव केंद्र बंद असून येथील बागायतदारांना बहरलेल्या झाडांकडे बघत राहण्या पलीकडे दुसरा पर्याय सध्या नाही.

(फोटो सौजन्य – विजय राऊत)

यंदाच्या हंगामात लांबलेला पाऊस व नंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे चिकू बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाच्या फळ पीक विमा योजनेत वातावरणाशी निगडीत काही जाचक अटी या योजनेत अंतर्भूत केल्याने उत्पादनाच्या मुख्य भागातील बहुतांश शेतकऱ्यांना फक्त पन्नास टक्के नुकसान भरपाई मिळाली होती. अशा परिस्थितीत मार्च महिन्यात सुरू होणाऱ्या चिकूच्या हंगामामध्ये पूर्वी झालेले नुकसान भरून निघेल या आशांवर करोना परिस्थितीने पाणी फिरले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्च महिन्यात विक्री सुरु असताना 10 ते 15 रुपये किलो या दराने या फळाची विक्री होत होती. अनेक राज्याने सीमा बंद केल्याने तसेच शहरांमध्ये बाजार भरत नसल्याने या चिकू पाठवायला शक्य होत नाही. काही शेतकऱ्यांनी चिकू वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याला ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे. संचारबंदी उठल्यानंतर बाजारपेठेत द्राक्ष, कलिंगड, आंबा यांच्यासह इतर फळे दाखल होणार असल्याने चिकू फळाला अपेक्षित बाजारपेठ मिळणार नाही अशी भीती बागातदाराकडून व्यक्त होत आहे. यामुळे गेल्या संपूर्ण वर्ष येथील बागायतदारांना वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासले असून निखळून पडणाऱ्या चिकूचे करायचे काय असा प्रश्न येथील बागायदारांना पडला आहे.