तिसऱ्या लॉकडाउनसंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी संध्याकाळी पत्रक जारी करत तीन मे नंतरही पुढील दोन आठवडे लॉकडाउन सुरु राहणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा होण्याच्या तासभर आधीच एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज यांनी लॉकडाउनसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. लॉकडाउन किती पुढे पुढे नेणार आहात?, कधी संपणार आहात याबद्दल केंद्र तसेच राज्य सरकारने स्पष्टपणे भूमिका मांडणे गरजेचे असल्याचे मत राज यांनी व्यक्त केलं होतं.

लॉकडाउनसंदर्भात राज यांना प्रश्न विचारण्यात आला असता लोकं लॉकडाउनचा पालन करतायत पण सरकारी नियोजनामध्ये गोंधळ असल्याने त्यांना घराबाहेर पडावं लागत आहे असं मत व्यक्त केलं. “लॉकडाउनला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. पण काही ठिकाणी सरकारी नियोजनामध्ये अभाव असल्याने लोकं बाहेर येताना दिसतायत. म्हणजेच पाहा किराणा, भाजी आणायला दोनच तास दुकाने उघडी ठेवली तर गर्दी होणारच. सकाळी नऊपासून अमूक वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवली आणि थोडी मोकळीक दिली तर लोकं सोशल डिस्टन्सिंग पाळून करतील खरेदी. पण भविष्यात सोशल डिस्टन्सींग किती राहील याची चिंता आहे,” असं मत राज यांनी व्यक्त केलं.

आणखी वाचा- आता कोकीळेचा आवाजही कोविड कोविड येऊ लागलाय: राज ठाकरे

लॉकडाउनसंदर्भात केंद्र तसेच राज्य सरकारचे काही धोऱण स्पष्ट नसल्याची टीकाही राज यांनी केली. लॉकडाउन किती वेळ सुरु ठेवायचं याच्या मर्यादा असल्या पाहिजेत. किती काळ आपण लॉकडाउनमध्ये असणार आहोत?, लॉकडाउन कधी काढणार आहात? किती पुढे पुढे नेणार आहात?, असे सवाल राज यांनी लॉकडाउनबद्दल बोलताना उपस्थित केले. “कितीवेळ चालू ठेवणार आहात याचा काही मर्यादा पाहिजे. अशाप्रकारचं संकट जगाने कधी पाहिलं नाही हे मान्य पण शेवटी आपण लॉकडाउनमध्ये किती काळ असणार आहोत? तुम्ही लॉकडाउन काढणार आहात तर तो कसा काढणार आहात याबद्दल केंद्राकडून राज्याकडून काही सांगितलं जात नाहीय,” अशा शब्दांमध्ये राज यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

“करोना काही मरणार नाहीय. म्हणजे असं नाहीय ना की तुम्ही सांगितलं की १८ तारीख तर १८ तारखेला संध्याकाळच्या फ्लाइटने करोनाचा चाललाय. मग आपण सगळं उघडू. असं घडणार नाहीय. किती काळ तुम्ही बंद ठेवणार आहात त्याचा देशावरती, राज्यावरती आणि शहरांवरती होणारा आर्थिक परिणाम आपण पाहिजे पाहिजे,” असं मत राज यांनी व्यक्त केलं. “रुग्ण किती बरे होतात हे पाहिले पाहिजे. अनेक रोगांमध्ये मृत्यूचे प्रमाण खूप आहे. टीबी, रेल्वे, रस्त्यावरचे अपघात वर्षभरात दीड लाख लोकं मरतात तर कोणी गाडीत किंवा बसमध्ये बसायला नाकारतं का? नाही ना? त्यामुळेच तुम्ही किती पुढे नेणार आहात?, असं लॉकडाउन किती काळ सुरु ठेवणार? हे ठरवायला हवं. तुम्ही जपानमध्ये गेलात, चीनमध्ये गेलात तर फार पुर्वीपासून बघतोय तिथे लोकं मास्क लावून फिरतात. आजार असो किंवा नसो ते लोकं अंतर पाळतात. तेच सध्या करणं गरजेचं आहे,” असं मत राज यांनी व्यक्त केलं. तसेच जास्त काळ लॉकडाउन सुरु केल्याने काहीच साध्य होणार नाही, असंही राज यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्रावर संकटं घेऊन आली: राज ठाकरे

राज यांनी सांगितला तो किस्सा

लोकांना खाण्यासाठी अन्नधान्य नसल्याचे सांगताना राज यांनी एक किस्सा सांगितला. “तीन दिवसापूर्वी माझ्या मित्राची पत्नी आणि मुलगा गोरेगावला खरेदीसाठी गेले. त्यांनी हव्या असणाऱ्या गोष्टी घेतल्या आणि ते घराकडे जायला निघाले. मुलगा गाडी चालवत होता आणि त्या मित्राची पत्नी बाजूला बसली होती. २५ ते ३० जणांनी त्यांची गाडी घेरली आणि जेवण पाहिजे जेवण पाहिले असं ओरडायला लागले. त्यावेळी त्यांनी लांब व्हा आणि काय हवयं ते सांगा असं या लोकांना सांगितलं असता त्यांनी जेवण नको आम्हाला तेल, गहू, तांदूळ हवे आहेत असं सांगितलं. त्यानंतर तेथील ४० ते ४५ जणांना माझ्या मित्राच्या पत्नीने या सर्व गोष्टी दुसऱ्या दिवशी आणून दिल्या. मात्र त्या जेव्हा वस्तू वाटपासाठी गेल्या तेव्हा तिथे ते सगळेजण तिची वाट बघत उभे होते,” असं राज यांनी सांगितलं. या प्रसंगावरुन लोकांचे किती हाल होत असल्याचे राज यांना सांगायचं होतं.