सध्या करोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती असून अनेल लोक दुकानं तसंच सुपर मार्केटमध्ये गर्दी करत असून सामान खरेदी करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे. त्यामुळे त्याचा साठा करून ठेऊ नका असं आवाहन केलं आहे.

उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे की, “जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे. त्याची अजिबात कमतरता नाही. तसेच ही दुकाने किंवा सेवा बंद राहणार नाहीत. त्यामुळे त्याचा साठा करून ठेऊ नका. अजिबात घाबरून जाऊ नका. संकट गंभीर असले तरी सरकार खंबीर आहे. निश्चय, संयम, जिद्द आणि स्वंयशिस्त या माध्यमातून आपण सर्व मिळून या संकटावर नक्की मात करू”.

करोनाशी मुकाबला करतांना आपण आता अधिक खंबीर पावले टाकत आहोत. हा रोग समाजात पसरण्याच्या आत रोखणे महत्वाचे आहे, सर्वात कठीण काळ आता सुरु झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत असल्याची घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. मात्र यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता निश्चय, संयमाने शासनाच्या बरोबरीने याचा मुकाबला करावा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अत्यावश्यक सेवेसाठीच बसेसचा वापर
रेल्वे , खासगी आणि एस टी बसेस बंद करण्यात येत आहेत. लोकल सेवाही बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना प्रवास करता यावा म्हणून शहरांतर्गत बस सेवा सध्या सुरु राहील. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला, औषधी, वीजपुरवठा करणारी केंद्रे सुरुच राहतील हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की वित्तीय सेवा देणाऱ्या शेअर बाजार आणि बँकासारख्या संस्थाही सुरुच राहतील.