जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केलेल्या कामाचे देयक काढण्यासाठी ‘टक्केवारी’ मागणारा तालुका कृषी अधिकारी बद्रिनारायण काकडे व पर्यवेक्षक राजेभाऊ दोडे हे दोघे लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाले आहेत. लाचलुचपत विभागाने दोघांचीही बँक खाती व लॉकर सील केले.
पाथरी तालुक्यात या अभियानांतर्गत मोठय़ा प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात आली. जुने तलाव, बंधाऱ्यातील गाळ काढणे, सिमेंट बंधारे अशी कामे लोकसहभागातून करण्यात आली. काही गावांत कामे करण्यासाठी आराखडे करून विविध विभागांमार्फत कामे प्रस्तावित होती. पोहेटाकळी, देवनांद्रा, झरी, डोंगरगाव, आनंदनगर, किन्होळा, पाथरगव्हाण या गावांत प्रस्तावित कामांचा समावेश होता. सिमेंट बंधारे, मातीनाला बांध, विहीर पुनर्भरण, नाला खोलीकरण अशा कामांना निधी देण्यात आला. ही कामे यंत्र असणाऱ्या नोंदणीकृत कंत्राटदारांना देण्यात आली. परंतु कृषी अधिकारी, कंत्राटदाराने संगनमत करून बनावट कामे केली. या बदल्यात अधिकाऱ्यांना ‘टक्केवारी’ देण्याचे ठरले होते. पाथरी येथील कंत्राटदार गोिवद पानखेडे यांनी आपल्याकडे असणाऱ्या जेसीबीच्या साहाय्याने तालुक्यात कामे केली. त्याची देयके काढण्याची मागणी तालुका कृषी अधिकारी काकडे व कृषी पर्यवेक्षक दोडे यांनी केली होती. मात्र, या दोघांनी तब्बल ४ लाख रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी कंत्राटदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर तालुका कृषी कार्यालयात सापळा रचण्यात आला. कंत्राटदाराकडून चार लाखांपकी दोन लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपतच्या तक्रारीवरून दोघांवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून दोघेही पसार झाले. २० जुलैला दोघांनी हजर राहावे, अशी नोटीस लाचलुचपत कार्यालयाने बजावली होती. मात्र, दोघेही हजर झाले नसल्याने मंगळवारी विभागाने दोघांचीही बँक खाती व लॉकर सील केले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jul 2015 रोजी प्रकाशित
लाचखोर अधिकारी पसार; बँक खाती-लॉकरला सील
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केलेल्या कामाचे देयक काढण्यासाठी ‘टक्केवारी’ मागणारा तालुका कृषी अधिकारी बद्रिनारायण काकडे व पर्यवेक्षक राजेभाऊ दोडे हे दोघे लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाले आहेत.

First published on: 23-07-2015 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corrupt officer runaway bank account locker seal