सांगली : महापालिकेत घरपट्टी विभागात लिपिक म्हणून कार्यरत असताना बेहिशेबी मालमत्ता केल्याप्रकरणी निवृत्त कर्मचारी व त्याच्या पत्नीविरोधात बुधवारी लाचलुचपत विभागाने मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.याबाबत लाचलुचपत विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार निवृत्त कर्मचारी नितीन उत्तुरे (वय ६३, रा. सांगलीकर मळा, मिरज) हे महापालिकेत घरपट्टी विभागात लिपिक म्हणून १९९० ते २०१९ पर्यंत कार्यरत होते.
या कालावधीत त्यांनी भ्रष्ट मार्गाने माया जमवली होती, अशा तक्रारी होत्या. या तक्रारीची लाचलुचपत विभागाकडून पडताळणी केली असता ज्ञात उत्पन्नापेक्षा त्यांच्याकडे ३५ लाख १६ हजार १९२ रुपयांची अतिरिक्त मालमत्ता आढळून आली. या प्रकरणी त्यांच्यासह भ्रष्टाचाराच्या मार्गाने बेहिशेबी मालमत्ता जमा करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या पत्नीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपअधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक भिलारे यांनी तपासाधिकारी म्हणून काम केले.