रत्नागिरी : संरक्षणावर (डिफेन्स)आधारीत प्रदूषण विरहीत दहा हजार कोटींचा प्रकल्प तालुक्यातील वाटद पंचक्रोशीत येणार असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वाटद पंचक्रोशीतील ग्रामस्थांना कोणी भडकवण्याचा प्रयत्न करीत असेल तर ग्रामस्थांशी चर्चा केली जाणार आहे. याठिकाणी प्रदूषण विरहीत असा डिफेन्सवर आधारीत प्रकल्प येणार आहे. दहा हजार कोटींच्या या प्रकल्पात स्थानिक तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाबाबत कोणी विरोधकांनी वावड्या उठवण्याचा प्रयत्न करु नये असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रत्नागिरीत डिफेन्स क्लस्टर उभारण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यातूनच हा दहा हजार कोटींचा प्रकल्प उभारला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आणखी वाचा-Chhagan Bhujbal : “आंतरवालीतून जरांगे पाटील निघून गेले होते, रोहित पवारांनी…”, छगन भुजबळांचा दावा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रत्नागिरीतील मिऱ्या एमआयडीसीबाबत काहीजण आकस ठेवून विरोध करीत आहेत. मिऱ्या ग्रामपंचायतींच्या ठरावाबाबत आपल्याला माहिती मिळाली आहे. आपण मिऱ्यावासियांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर त्यांनी निर्णय घ्यावा. याठिकाणी लॉजिस्टीक पार्क उभारले जाणार होते. लोकांना नको असेल तर त्याप्रमाणे होईल. मात्र काही विरोधक याविरोधात रान उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपण पुढील दौऱ्यात मिऱ्यावासियांची भेट घेणार असून, येथील जनतेला वेळ देणार आहोत. त्यांना काय हवे हेही समजून घेणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी तालुक्याचा औद्योगिक विकास व्हावा यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न आहेत. याठिकाणी प्रदूषणकारी प्रकल्प न आणता, प्रदूषणविरहीत प्रकल्प आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.