महाबळेश्वरमध्ये धबधब्यात उडी मारुन प्रेमी युगुलाची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी या दोघांनीही आपल्या हाताच्या नसा कापून घेतल्याचे समोर आले आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

महाबळेश्वर येथील लिंगमळा येथील धबधब्यावरून उडी मारून पर्यटक जोडप्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या दोघांनीही आपल्या हाताच्या नसा कापून घेतल्याचे समोर आले आहे. अविनाश अशोक शिर्के (वय २६, निम्बोडी, नगर) प्रियांका मनोहर शिंदे (वय २६,नऱ्हे, पुणे ) अशी या दोघांची नावे आहेत. महाबळेश्‍वरजवळ लिंगमळा धबधबा आहे. शुक्रवारी सकाळी हॉटेल बाहेर पडल्यावर हे दोघे टॅक्सीने लिंगमळा धबधबा पाहण्यासाठी गेले. अर्धा ते एक तासात सर्व पर्यटक धबधबा पाहून परत येतात. परंतु दुपारी चार वाजले तरीही हे दोघे धबधब्यावरून परत आलेच नाहीत.

टॅक्सी चालक चार वाजता पुन्हा जाण्यासाठी निघाला आणि त्याने अशाप्रकारे आपल्यासोबत आलेले पर्यंटक परत न आल्याचे वनव्यवस्थापन समितीच्या कर्मचाऱ्याना सांगितले. त्यांनी याबाबत वनक्षेत्रपाल रणजीत गायकवाड यांना कळवले. गायकवाड यांनी वन विभागाचे कर्मचारी व वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या मदतीने दोघांचा शोध घेण्यासाठी धबधब्याचा परीसर व जंगल पिंजुन काढले. परंतु ते कोठेही आढळून आले नाहीत. शोधाशोध करुनही या प्रेमी युगुलाचा शोध न लागल्याने वन विभागाने ही माहिती महाबळेश्‍वर पोलिस ठाण्याला कळवली. महाबळेश्‍वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी तातडीने महाबळेश्‍वर व सहयाद्री ट्रेकर्सच्या जवानांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली.

शोधकार्य सुरू केल्यावर धबधब्याच्या मुख्य भागात रक्ताने माखलेला एक चाकू आढळून आला. याच ठिकाणी अविनाश शिर्के यांचे आधारकार्डही मिळाले. त्यानंतर या दोघांचा शोध धबधब्याच्या दरीत घेण्यात आल्या नंतर साधारण अडीचशे ते तीनशे फुट खोल दरीत अगोदर महीलेचा व नंतर पुरूषाचाही मृतदेह ट्रेकर्सच्या जवानांना सायंकाळी सात वाजता सापडला. रात्री उशीरा महाबळेश्‍वर पोलिस व ट्रेकर्सचे जवान व भेकवली वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू केले. दोघांनीही आत्महत्येपूर्वी हाताच्या नसा कापून धबधब्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. अविनाश हा अविवाहित होता तर प्रियांका शिंदे हिचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तिला दोन मुले असल्याचेही महाबळेश्वर पोलिसांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Couple suiside by jumping in waterfall in mahabaleshwar lingmala