मुंबईतील शिवडी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत या दोघांनाही समन्स बजावलं आहे. या दोघांनाही कोर्टाने १४ जुलै रोजी कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. खासदार राहुल शेवाळे यांची सामनाच्या अग्रलेखातून बदनामी करण्यात आली, खोटी बातमी करण्यात आली. त्यानंतर राहुल शेवाळेंनी मानहानीचा अर्ज दाखल केला होता. ज्यानंतर हे समन्स बजावण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी जून २०२२ या महिन्यात बंड केलं. त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. दोन्ही गटांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. अशात २९ डिसेंबर २०२२ या दिवशी सामनाच्या हिंदी आणि मराठी आवृत्तीत एक लेख प्रकाशित करण्यात आला होता. त्या लेखात राहुल शेवाळेंचे दुबई आणि पाकिस्तानातील कराचीत रिअल इस्टेटमध्ये हितसंबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर शेवाळे यांनी वकील चित्रा साळुंखेंच्या मार्फत ३ जानेवारी २०२३ ला नोटीस पाठवून या लेखातील दाव्यांचा स्रोत काय? अशी विचारणा केली होती. त्यानंतर एका महिलेने सोशल मीडियावर केलेला दावा आणि अन्य माहितीच्या आधारे हा लेख दिला असं उत्तर सामनाकडून देण्यात आलं होतं.

१०० कोटींच्या मानहानीचा दावा

सामनाकडून उत्तर आल्यानंतर राहुल शेवाळेंनी दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींच्या मानहानीचा दावाही दाखल केला आहे.

दंडाधिकारी न्यायालयाने ट्रॉम्बे पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ च्या अंतर्गत तपासाचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे, पोलिसांनी शेवाळेंना बोलावून त्यांचा जबाबही नोंदवला आहे. सामना या शिवसेनेच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला मूळ लेख हा पुरावा म्हणून शेवाळे यांनी सादर केला आहे.