विजेचा धक्का बसून युवा खेळाडूचा मृत्यू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगर : विजेचा धक्का बसून युवा खेळाडूचा मृत्यू झाल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी महावितरण कंपनीचा कनिष्ठ अभियंता, टीव्ही केबल चालक, पुरवठादार अशा एकूण सहा जणांविरुद्ध मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अजिंक्य सुरेश गायकवाड (३०, रा. साईनगर, बुरुडगाव रस्ता, नगर) या युवा खेळाडूचा ३१ ऑगस्ट रोजी विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. या संदर्भात त्याचे वडील माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांनी तक्रार केली होती. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. अधिक तपासानंतर सहा जणांविरुद्ध मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक आर. आर. शिंदे करत आहेत.

श्रीगणेश केबल सर्विसच्या मालक वनिता अनिल बोरा या कंपनीसाठी काम करणारा त्यांचा मुलगा पीयूष अनिल बोरा (दोघे रा. विनायकनगर) महावितरणचे कनिष्ठ अभियंता, बोरा यांना केबल कनेक्शन पुरवणारे नगरमधील पुरवठादार, टीव्ही केबल पुरवठादार कंपनी, महावितरणच्या वीजवाहक तारावर चढणारे संबंधित कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरण कार्यालयाने दिलेल्या अहवालानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांना देण्यात आलेले टीव्ही केबल कनेक्शन सुमारे ७० ते १०० फूट अंतरावरून आले होते. त्याच ठिकाणी ११ केव्हीची वीज तार होती. या वीजतारांवरून ही केबल आली होती. दोन्ही तारांच्या घर्षणामुळे टीव्ही केबलचे बाहेरील इन्शुलीन आवरण निकामी होऊन टीव्ही केबलमध्ये वीजप्रवाह उतरला. त्यामुळे घरातील टीव्ही केबलला हात लावल्यानंतर विजेचा धक्का बसून अजिंक्यचा मृत्यू झाला. या प्रकरणात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करून मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime against 6 persons including msedcl engineer death of a young player akp
First published on: 14-10-2021 at 02:20 IST