केबीसीच्या संचालकाने जिल्ह्यात अनेक ग्राहकांना कोटय़वधीचा गंडा घातला, मात्र तक्रार करण्यास कोणीच सरसावत नव्हता. अखेर लोहगाव येथील काशिनाथ खिल्लारे या ग्राहकाने १४ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार केल्यावरून हिंगोली ग्रामीण पोलिसात बापूसाहेब चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, आरती चव्हाण, नाना चव्हाण, सोपान चव्हाण, कविता चव्हाण, राजाराम शिंदे, बाजीराव शिंदे, पंकज शिंदे, संजय जगताप आदींवर गुन्हा दाखल झाला.
दामदुपटीच्या नावाखाली केबीसीच्या संचालक मंडळाने जिल्ह्यात अनेकांची मोठय़ा प्रमाणात फसवणूक केली. जवळाबाजार, डिग्रस कऱ्हाळे, भोसी, लोहगाव, टाकळगव्हाण, नालेगावसह अनेक गावांतून पसा उकळला. वसमत येथील गुज्जेवार यांचा या तणावातून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. परभणी, नाशिकमध्ये गुन्हे दाखल होताच हिंगोलीतील ग्राहकांनाही आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी या प्रकरणी तक्रारदारांसाठी मुख्यालयात कक्ष स्थापन केला. तेथे, तसेच कळमनुरी येथे दोघांच्या फिर्यादीवरून ३९जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. ही प्रकरणे पुढील तपासासाठी नाशिक पोलिसात वर्ग करण्यात आले. सुरुवातीला १५० लोकांनी सामूहिक, तर सहा जणांनी टपालाद्वारे दाभाडे यांच्याकडे तक्रार केली. औंढा, सेनगाव, कळमनुरी तालुक्यातून २३जणांनी पोलीस मुख्यालयात येऊन सामूहिक तक्रार दिली.