श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातील निवडणूक पैसेवाटपाच्या आरोपावरून थेट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रीगोंदे शाखेतच पोहोचली. यावरून झालेल्या गोंधळात अखेर पोलिसांनी सोमवारी रात्री बँकेच्या या शाखेलाच सील लावले.
याबाबत राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांचे वडील तथा जिल्हा बँकेचे संचालक कुंडलिक जगताप, भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते, तुकाराम दरेकर यांच्यासह सुमारे सत्तर जणांवर बेकायदेशीर जमाव गोळा केला म्हणून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. मंगळवारी सकाळी दोन्ही गटांमधील तिघांना पोलिसांनी अटक केली व नंतर सोडून दिले.
या बाबत घडलेली घटना अशी की, सोमवारी रात्री श्रीगंोंदे येथील जिल्हा सहकारी बँकेच्या कळकाई चौक या शाखेतील विकास अधिकारी त्यांच्या खोलीमध्ये बसून रात्री आठ वाजता राष्ट्रवादीचे उमदेवार राहुल जगताप यांचे वडील कुडंलिकराव जगताप हे पैसे वाटप करत असल्याची वृत्त शहरात पसरले. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने बँकेबाहेर जमले. काही वेळातच तहसीलदार विनोद भामरे व पोलीस निरीक्षक सचिन सानप हेही घटनास्थळी आले. त्यांनी लगेच बँकेचे दरवाजे सील केले व तपासणी केली. त्याच वेळी बबनराव पाचपुते हेही येथे आले. त्यानंतर येथेच दोन्ही गटांकडून आधी जोरदार घोषणाबाजी व नंतर दगडफेकही सुरू झाल्याने एकच पळापळ झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपाधीक्षक धीरज पाटील यांनी दंगलनियंत्रक पथकाला लाठीमाराचे आदेश दिले. सौम्य लाठीमार करताच जमाव आटोक्यात आला. मात्र यात एक होमगार्ड व एक पोलिस कर्मचारी व काही कार्यकर्ते जखमी झाले.
पोलिसांना येथे आक्षेपार्ह रोकड किंवा अन्य काही गोष्टी आढळल्या नाहीत. मात्र मंगळवारी सकाळी पोलिस नाईक परमेश्वर गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बबनराव पाचपुते, कुंडलिकराव जगताप, तुकाराम दरेकर, विठ्ठल काकडे, बाळासाहेब महाडिक यांच्यासह दोन्ही गटांच्या ७० जणांवर बेकायदेशीर जमाव गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा बँकेचेही सील मंगळवारी सकाळीच उघडण्यात आले. त्यानंतर लगेचच दैनंदिन व्यवहार पूर्ववत झाले.