विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, पोलीस यंत्रणा सतर्क झाल्याचे सांगितले जात असताना शहरात घरफोडी, अपहरण, वाहतूक पोलिसांना दमदाटी असे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संचलन व गुन्हेगारांचे अटकसत्र राबवून पोलीस यंत्रणा आपले अस्तित्व अधोरेखीत करत असताना दुसरीकडे गुन्हेगार मंडळी वरचढ ठरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पंचवटी परिसरातील वृंदावननगर परिसरात गुरूवारी रात्री पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. काही युवक वेगाने दुचाकी चालवताना दिसल्यावर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले. त्यांच्या वाहनाची तपासणी सुरू असताना बंटी कोळी, नारायण मराठे आणि त्यांच्या दोन साथीदार पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. तुम्हाला पाहुन घेईल, तुमची फिल्डिींग लावतो अशा शब्दांत दमदाटी करत संशयित पोलिसांच्या अंगावर धावून गेले. पथकाने पोलिसी खाक्या दाखविण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी गाडीसह पलायन केले. यावेळी मराठे व कोळी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यासह एकूण चार जणांविरुध्द आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एका अल्पवयीन मुलीचे कॉलेजरोड परिसरातून अपहरण करण्याची घटना घडली. नवनाथ अपार्टमध्ये देवाशिष सिंग हे आपल्या कुटूंबासमवेत राहतात. बुधवारी त्यांची १३ वर्षांची मुलगी दुपारी साडे बाराच्या सुमारास खेळण्यास जाते असे सांगून घराबाहेर पडली. पण ती परत आलीच नाही. कुटुंबयांनी शोध घेतला असता ती सापडली नाही. कोणीतरी तिचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत कुटुंबियांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चोरी व घरफोडय़ांचे सत्रही अव्याहतपणे सुरूच आहे. उपनगर परिसरातील श्रीहरी बंगला येथील रहिवाशी संजीव महाले कुटूंबासह बाहेर गेले होते. अज्ञात चोरटय़ांनी बंद दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन घरात प्रवेश केला. सामानाची नासधूस करत लोखंडी कपाटाचे दार कटरच्या सहाय्याने फोडून आतील तिजोरीतून ८० हजाराहून अधिक रक्कमेचा ऐवज लंपास केला. यामध्ये साठ हजार रुपयांची रोख रक्कम, दोन तोळ्याची सोन्याची पोत, कानवेल, मनी मंगळसूत्र, मोरणी, चांदीच्या साखळ्या या स्त्रीधनासह देवाचे तीन टाक आदींचा समावेश आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Oct 2014 रोजी प्रकाशित
कडय़ा बंदोबस्तातही गुन्हेगारी घटना सुरूच
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, पोलीस यंत्रणा सतर्क झाल्याचे सांगितले जात असताना शहरात घरफोडी, अपहरण, वाहतूक पोलिसांना दमदाटी असे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
First published on: 11-10-2014 at 06:21 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crimes continue in nashik