गुजरातेत काँग्रेसचे मुख्यमंत्री हेमंतभाई पटेल, अमरसिंह चौधरी, महादेवसिंह सोळंकी यांच्या काळात असलेला विकासदर नरेंद्र मोदी यांच्या काळात मात्र ५० टक्क्यांनी कमी झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर येऊन मोदी यांनी आपल्या कार्यकाळातील विकासाचा आलेख मांडावा, असे जाहीर आव्हान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. ऊसतोड कामगारांचे प्रश्न आम्ही सोडवले, पण निवडणुकांच्या काळात काही जण मी हे प्रश्न सोडवले असे म्हणत असल्याचा टोलाही मुंडे यांचे नाव न घेता त्यांनी लगावला.
बीडमधील आघाडीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ सोमवारी आष्टीत पवार यांची सभा झाली. धस, पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर उपस्थित होते. पवार म्हणाले, की भाजप केवळ विरोधाचे राजकारण करीत आहे. कांद्याच्या भाववाढीमुळे शेतकऱ्यांची स्थिती सुधारली, तर भाव वाढल्याचे भांडवल करून संसद बंद पाडली जाते आणि निवडणुकीत शेतकऱ्यांचा कळवळा आणला जातो. प्रसारमाध्यमांमधून सातत्याने मोदी व गुजरातचे चित्र दाखवले जाते. पण गुजरातपेक्षा महाराष्ट्रात जास्त विकास झाला आहे. मोदींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर येऊन विकासाबाबत खुली चर्चा करावी, असे आव्हान पवार यांनी मोदींना दिले. गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री हेमंतभाई पटेल, अमरसिंह चौधरी, महादेवसिंह सोळंकी यांच्या काळात गुजरातचा विकास झाला, मात्र त्या तुलनेत मोदी यांच्या काळात विकास ५० टक्क्यांनी घटला. त्याप्रमाणे देशाच्या विकासात घट करण्याचे षड्यंत्र भाजपकडून रचले जात असल्याचा आरोपही पवार यांनी केला.
गुजरातेत व्यापारीकरणावर विशेष भर दिला जातो. त्याप्रमाणे मोदींनी गुजरातचे व्यापारीकरण करीत राज्याला अधोगतीकडे नेले. आता मोदींना देशही अधोगतीकडे न्यायचा आहे. भाजपकडून २००४प्रमाणेच या निवडणुकीतही अशीच आकडेवारी छापून आणली जात आहे. परंतु ही आकडेवारी खोटी असल्याचा दावा पवार यांनी केला. बीडमधून उमेदवारी दिलेले सुरेश धस उत्तराखंडमध्ये जाऊन आपद्ग्रस्तांना मदत करतात हे राज्याने पाहिले आहे. हा जिल्हा ऊसतोडणी कामगारांचा आहे. प्रश्न निर्माण झाले, तेव्हा आम्हीच सोडवले, पण काही जण निवडणुकीच्या काळात ऊसतोड कामगारांचे नेते म्हणून आम्हीच प्रश्न सोडवल्याचे सांगतात, असा टोलाही गोपीनाथ मुंडे यांचे नाव न घेता पवारांनी लगावला.
आष्टीचे दोन माजी आमदार भाजपकडे गेल्याचा उल्लेख करून त्यांच्या अपेक्षा मोठय़ा होत्या, पण अशी बदलणारी भूमिका लोक स्वीकारणार नाहीत, असा चिमटा पवार यांनी काढला. उमेदवार धस, क्षीरसागर, धनंजय मुंडे यांचीही भाषणे झाली.