|| निखिल मेस्त्री
डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा:- पालघर जिल्ह्य़ातील डहाणू तालुक्यातील पिकांवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रार्दुभाव झाल्याने सावधगिरीचा इशारा शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. ही अळी इतर पिकांनाही लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अळीमुळे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान लक्षात घेऊन कृषी विज्ञान केंद्रासह कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी अधीक्षक के. बी. तरकसे यांनी केले आहे.
डहाणू तालुक्यात ही लष्करी अळ सापडल्यामुळे तिची लागण इतर पात असणाऱ्या पिकांना लागण्याची शक्यता आहे. एकटय़ा डहाणू तालुक्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप भात लागवड, तर सुमारे पाच हजार हेक्टरवर चिकू फळबागा आहेत. जर या अळींचा भात पिकावर प्रादुर्भाव झाला तर शेतकऱ्यांचे हातचे पीक जाऊन नुकसानीचा आकडा मोठा असेल आणि आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे. याआधीच शेतकरी अतिवृष्टी, बदलते हवामान यामुळे पिकांवर होणाऱ्या परिणामांमुळे हतबल आहे. त्यात या नवीन रोगाचा प्रादुर्भाव समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कोसबाड कृषी विज्ञान केंद्राच्या क्षेत्रावरील पिकांवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळला आहे. ही पिकावरील बहुभक्षीय कीड असून मका हे तिचे प्रमुख खाद्यान्न आहे. या तालुक्यात नव्यानेच तिचा शिरकाव झाल्याची बाब कृषी तज्ज्ञांना आढळून आली आहे.
अमेरिकन लष्करी कीड ही श्रीलंकेतून भारतात आली असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. या अळीच्या कोशापासून पतंग तयार होऊन ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात आणि मादी पतंग ज्या ठिकाणी पिकांवर स्थिरावते. त्या पिकांवर ती अंडी देऊन त्यातून अळ्या तयार होऊन या आल्याचे ते पीक खाद्य बनते. या स्थितीतील अळ्या पिकाची हानी करीत आहेत.
एकात्मिक प्रतिबंधात्मक पद्धतीचा वापर करून या अळींचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणू शकतो असे पुण्याच्या सिकथा ग्रेन संस्थेचे किटकशास्त्र्ज्ञ (sikth grain) डॉ. अंकुश चोरमुले यांनी म्हटले आहे.
अमेरिकन लष्करी अळीचे मका हे जरी या आळीचे प्रमुख अन्न असले तरी भविष्यात इतर पिकावर जसे भात, मिरची, टोमेटो, वांगी व इतर भाजीपाला, सफेद जाम्बु, चिकूवर येण्याची शक्यता आहे.
म्हणून कोणाला परिसरात जर या अळीचा प्रादुर्भाव दिसला तर त्वरित कृषि विज्ञान केंद्राला सूचना द्यावी, असे कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे उत्तम सहाने यांनी लोकसत्ताला सांगितले.
जिल्ह्यतील कीटक रोगांसाठी पिकांचे वेळोवेळी निरीक्षण सुरू आहे याबाबत शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन होत आहे. रोगाच्या निरीक्षणानुसार पिकांच्या नुकसानीचा अंदाज घेऊन त्यानुसार हे नमुने शास्त्रज्ञांकडे आणि विविध संस्थांकडे पाठवून त्यावर उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन मागवित आहोत. या रोगाचा प्रार्दुभाव कमी असला तरी खबरदारी म्हणून शेतकऱ्यांनी पिके वारंवार तपासावीत. अळी आढळल्यास कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
– के. बी.तरकसे, जिल्हा कृषी अधीक्षक