बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलन पेटलं आहे. सोमवारी ( ३० ऑक्टोबर ) ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा आणि सर्व तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर हद्दीपर्यंत, तसेच सर्व महामार्गावर पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी घेतला आहे.

आदेशात काय?

बीड जिल्हयात मराठा समाजास सरसकट कुणबी आरक्षण देण्याबाबतच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध भागात आंदोलन, उपोषण चालू आहेत. २९ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून या आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केले आहे. जिल्ह्यात परिवहन महामंडळ व इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनास आग लावण्याचे प्रकार घडले आहेत. ज्याअर्थी आज ३० ऑक्टोबर रोजी आंदोलकांनी विविध शासकीय कार्यालयांवर मोर्चे काढून कार्यालये बंद केली व काही ठिकाणी कार्यालयास आगी लावणे व दगडफेक करणे असे प्रकार घडले आहेत. यामुळे सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

हेही वाचा : “जाळपोळ करणारे सत्ताधारी पक्षातील लोक, हे थांबवा अन्यथा…”, जरांगे-पाटलांचं विधान

बीड जिल्हयात चालू असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेस मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचत आहे. याबाबत मी स्वतः खात्री केलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्याच्या निर्णयाप्रती मी आले आहे, असं दिपा मुधोळ मुंडे यांनी म्हटलं.

हेही वाचा : प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक, वाहनांची जाळपोळ; भाजपाचे मंत्री म्हणाले, “गावबंदीपर्यंत समजू शकत होतो, पण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी बीडमध्ये हिंसक वळण लागलं. जिल्ह्यात पाच ते सहा ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर यांच्या घरांना आग लावण्यात आली. माजलगाव नगरपरिषदेच्या कार्यालयालाही लावली. त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी संचारबंदीचा निर्णय घेतला आहे.