केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील विविध राज्यांचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांचे दोन दिवसांचे चिंतन शिबीर हरियाणातील सुरजकुंड येथे आयोजित करण्यात आले होते. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षेसंबंधित अनेक विषयांवर मंथन करण्यात आले. या बैठकीला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात लवकरच ‘सायबर इंटिलिजन्स युनिट’ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

हेही वाचा – शिंदे सरकारच्या काळात गुजरातला ‘अच्छे दिन’; महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या १ लाख ८० हजार कोटींच्या ४ प्रकल्पांपैकी ३ गुजरातला

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात लवकरच ‘सायबर इंटिलिजन्स युनिट’ स्थापन करण्यात येणार आहे. हे ‘सायबर इंटिलिजन्स युनिट’ एक समर्पित सिंगल प्लॅटफॉर्म असेल. या माध्यमांतून सायबर गुन्ह्यांना आळा घालणारे जागतिक मॉडेल तयार होईल. सरकारी आणि खासगी बँका, वित्तीय संस्था, सोशल मीडिया संस्था, नियामक संस्था, सायबर पोलीस, तंत्रज्ञ असे सर्व या व्यासपीठावर एकत्रित राहणार असून त्यातून गतिमान यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर असेल. अलीकडच्या काळात आर्थिक आणि सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अन्य गुन्ह्यांच्या तुलनेत येणार्‍या काळात कदाचित या गुन्ह्यांचीच संख्या अधिक असेल. ही संस्था आधीच सज्ज असेल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अमित शाह यांचे मानले आभार

दरम्यान, ही बैठक आयोजित केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले. “कोणताही गुन्हा किंवा कायदा-सुव्यवस्था हा प्रश्न केवळ कोणत्याही एका राज्याचा प्रश्न नसतो, तर अनेक राज्यांना एकाचवेळी त्याचा सामना करावा लागतो. या बैठकीच्या माध्यमांतून केंद्र आणि राज्यात समन्वयाची उत्तम व्यवस्था तयार करण्यात आली, याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांचे मी विशेष आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – “अध्यक्ष महोदय, हे फायनल करा” २५ पैशांच्या नाण्यावर लावला नारायण राणेंचा फोटो, तक्रार दाखल

“आता गुन्हेगारांवर कारवाई करणे सोप्पे”

“सीसीटीएनएसमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक गतीने कार्यवाही पूर्ण केली. अ‍ॅम्बीसच्या माध्यमांतून सुद्धा मोठी प्रगती राज्य सरकार करते आहे. सुमारे ६ लाखांहून अधिक गुन्हेगारांचे बायोमेट्रीक तयार करण्यात आले आहेत. याला सीसीटीएनएसशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे नाव बदलून अन्य राज्यांमध्ये पुन्हा गुन्हे करतात, अशांना ओळखणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे सोपे होणार आहे. सीसीटीव्हीच्या जाळ्याला सायबर पोलिसांशी जोडल्यामुळे गुन्ह्यांचा तपास वेगाने होणार आहे”, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्याचा प्रयत्न”

“राज्यात 20 हजार पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाईला गती देण्यात आली असून यात केंद्र सरकारची मोठी मदत मिळत आहे. तसेच सागरी सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येत आहे”, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिली.