सर्व कार्यकर्त्यांच्या मनातील उमेदवार देऊ, असे सांगणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी शेवटी पाच दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश करणारे माजी खासदार डी. बी. पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशा-आकांक्षाचे कमळ दलदलीत फसले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून डी. बी. पाटील यांच्या नावाची घोषणा गुरुवारी रात्री दिल्लीहून झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांच्या आनंदाला भरते आले असले तरी उमेदवाराच्या शर्यतीतील खऱ्याखुऱ्या इच्छुकांचा पुरता विश्वासघात झाला असल्याची संतप्त भावना भाजपच्या कार्यकर्त्यांनी एसएमएसद्वारे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांना कळविली आहे. २४ फेब्रुवारीला डी. बी. पाटील अंबाजोगाईला गेले. तेथे गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडे उमेदवार नव्हता, अशी चर्चा सुरू होती. मात्र, तरीही विनोद तावडे यांनी नुकतेच इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. पण त्यांची ती कृती फार्स ठरली. पुन्हा एकदा उपऱ्या व्यक्तीलाच भाजपची उमेदवारी मिळेल, अशी माहिती काँग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांनी दिली होती. ती खरी ठरल्याचीही चर्चा नांदेडमध्ये होती. काँग्रेसच्या सोयीसाठी डी.बी.च्या उमेदवारीचा निर्णय घेतला गेला असावा, अशीही चर्चा आहे. २००४ ते २००९ या कालावधीत डी. बी. पाटील भाजपचे खासदार होते. त्या पुढील निवडणुकीत त्यांनी सहभाग नोंदविला नाही. काही महिन्यांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत ते राष्ट्रवादीत गेले होते. पुन्हा स्वगृही परतून भाजपाची उमेदवारी त्यांनी मिळविली.
संग्रहित लेख, दिनांक 1st Mar 2014 रोजी प्रकाशित
नांदेडमध्ये डी. बीं.नी ‘कमळ’ फुलविले!
सर्व कार्यकर्त्यांच्या मनातील उमेदवार देऊ, असे सांगणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी शेवटी पाच दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश करणारे माजी खासदार डी. बी. पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली.
First published on: 01-03-2014 at 01:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: D b patil candidate of bjp in nanded