प्रल्हाद बोरसे

मालेगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खास विश्वासू व महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषी मंत्रिपद भूषविलेले दादा भुसे हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने मालेगावात शिवसेनेची अवस्था अत्यंत केविलवाणी झाल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. पक्ष संघटनेची नव्याने बांधणी करणे आणि भुसेंना पर्याय निर्माण करणे असे दुहेरी अग्निदिव्य शिवसेनेला पार पाडावे लागणार असून आगामी काळात सेना हे आव्हान कसे पेलणार, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सन २००० च्या दशकात ठाणे जिल्ह्यात पाटबंधारे खात्यात नोकरीस असताना भुसे हे आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिघे यांच्या कार्यशैलीमुळे ते प्रभावित झाले. पुढे नोकरीचा राजीनामा देऊन भुसे यांनी मालेगावात प्रारंभी समाजकार्य व नंतर शिवसेनेच्या माध्यमातून राजकारण सुरू केले. भाजपा-सेनेची युती असताना २००४ मध्ये बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढवून त्यांनी विजयश्री खेचून आणली होती. अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यावरही विधिमंडळात शिवसेनेचे सहयोगी सदस्य होणे तेव्हा त्यांनी पसंत केले. त्यानंतर मागे वळून बघण्याची वेळच त्यांच्यावर आली नाही. सन २००९, २०१४ आणि २०१९ अशा विधानसभेच्या तीन निवडणुकांमध्ये त्यांनी शिवसेनेतर्फे सहज विजय मिळविला.

 सेनेशी असलेल्या निष्ठेमुळे २०१४ मध्ये युती शासन आल्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना राज्यमंत्री पदाची संधी दिली. तसेच ठाकरे सरकारमध्ये कृषीसारख्या महत्त्वाच्या खात्याची धुरा त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. दांडगा जनसंपर्क व सर्वसामान्यांना भावेल, अशी त्यांची कार्यशैली यामुळे तालुक्यात तळागाळापर्यंत शिवसेना पोहोचवली. कार्यकर्त्यांचे उत्तम संघटन करण्यातही भुसे यशस्वी झाले. त्याचा परिणाम म्हणून या सर्व काळात झालेल्या बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका अशा निवडणुकांमध्येदेखील सेनेला घवघवीत यश मिळू शकले. अर्थात, वरकरणी हे यश सेनेला मिळत असल्याचे दिसले तरी भुसे हाच पक्ष अशी गत तालुक्याची असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.

आनंद दिघे यांच्या तालमीत राजकीय व समाज कार्याचे धडे घेत असताना भुसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख झाली होती. दिघे यांच्या या दोन्ही शिष्यांमधील ओळखीचे पुढे घट्ट मैत्रीत रूपांतर झाले. गेल्या दोन तपांपासून उभयतांमध्ये हा दोस्ताना आहे. एकीकडे ठाकरे घराण्याशी अत्यंत जवळीक आणि दुसऱ्या बाजूला दोस्ताना अशा स्थितीत भुसे यांनी शिंदे यांनी केलेल्या बंडाला साथ करण्याचा निर्णय घेतला. शिंदे यांच्याशी असलेल्या या संबंधामुळे भुसे यांचे महत्त्व आणखी वाढेल आणि त्यांना मंत्रिमंडळात चांगले खाते दिले जाईल, असा भुसे समर्थकांचा होरा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 शिवसेनेची झालेली ही दुरवस्था सावरण्यासाठी आणि भुसे यांना पर्याय शोधण्यासाठी  शिवसेनेनेही आता तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. त्या दृष्टीने कुणी मातब्बर पक्षात येईल का याची चाचपणी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने भुसे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय व गेल्या वर्षभरापासून त्यांच्यापासून दुरावलेले बंडू बच्छाव यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सेनेतर्फे सुरू असल्याची चर्चा आहे.